हाच तो फोटो! हीच आमची पहिली ओळख आणि भेट.

Update: 2018-10-31 11:37 GMT

स्व. इंदिरा गांधींचा फ्रेम फोटो घरी माझ्या जन्माच्या आधीपासूनच भिंतीवर होता. लहान मुलांना घरात छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर उपलब्ध असलेल्या फोटोंची ओळख बालपणातच करून दिली जाते. मी ही या संस्कारात वाढलो. जरा समजू लागल्यावर कळलेलं की, त्या प्रधानमंत्री असताना श्रीगोंद्याला येऊन गेल्या आहेत. ज्या बैंकेत माझे वडील काम करत असत, त्या शाखेचे उदघाटन इंदिराजी गांधी यांच्या हस्ते करण्यात आले होते. बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा तो काळ होता. देशाला लाभलेल्या सर्वोत्तम प्रधानमंत्र्यांपैकी एक असलेल्या अद्वितीय साहस आणि अपार प्रेम आणि करुणेने व्यापलेल्या महासागर आहेत, इंदिराजी गांधी! आजही माझ्या संग्रही त्यांचे ओरिजिनल जुने फोटो आहेत. कधी कधी करमेना झालं, की लगेच संग्रही असलेल्या वस्तू, दुर्मिळ पुस्तके, फोटोज बघत बसतो. स्थिर होते चित्त. प्राथमिक शाळेत एका स्पर्धेत बक्षीस म्हणून 'माझे बालपण' नावाचं पुस्तक मिळालं होतं. त्यात पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, आचार्य अत्रे या आणि अशा अनेक व्यक्तींच्या आठवणी नोंदवलेल्या वाचायला मिळाल्या. श्यामची आई म्हणजे इंदिरा गांधी असेल, असं वाटण्याचा तो भाबडा काळ होता. श्यामच्या पायांना माती लागू नये म्हणून पदराने बाल श्यामचे पाय पुसणारी आई, कधी रागावून श्यामला शिक्षा करणारी, फणसाच्या गराचे समान वाटे शेजाऱ्यांना देणारी आई... तद्नंतर नेहरूंनी कन्या प्रियदर्शिनी इंदिरेला लिहिलेली पत्रे पुस्तकातून वाचली. नेहरूंच्या विशाल साहित्याची ओळख साने गुरुजींनी केलेल्या अनुवादाने व रस्त्यावर मिळवलेल्या इंग्रजी डिस्कव्हरी ऑफ इंडियाने करून दिली. तोवर नेहरूंनी लिहिलेल्या प्रवास वर्णनाने बालमनात घर केले होते. बर्फवृष्टी म्हणजे काय, हे त्यांनीच तर सर्वप्रथम समजवून सांगितलं होतं. जपानच्या लहान मुलांना हत्ती कसा असतो, हे दाखवण्यासाठी थेट जपानला हत्ती पाठवणारे चाचा नेहरू म्हणजे आपले दूर देशी असलेले प्रेमळ आजोबा असले पाहिजेत, असे वाटण्याचा हा काळ होता. वाचनाची ही मौज त्यावेळी निरागस बालमनाला हळुवार आकार देत होती. रुची वाढवत होती. प्राथमिक शाळेतून बाहेर येईतोवर छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तुकोबा, ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, कर्मवीर अण्णा, गाडगेबाबा यांचा परिचय घट्ट झाला. संत शेख महंमद महाराजांची समाधी श्रीगोंद्यात आहे. काशी विश्वेश्वर, शंकराचार्य, कुंभ मेला यांची माहिती मिड हायस्कुल पर्यंत समजली होती. या सर्व प्रवासात इंदिरा गांधी हे नाव अनेक संदर्भानी ऐकायला, वाचायला मिळत राहिलं. प्रियदर्शिनी अर्थात इंदिराजी गांधी. जगाच्या नकाशावर जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांचा समृद्ध वैचारिक वारसा लाभलेल्या देशाच्या तितक्याच समृद्ध, संघर्षशाली, सामर्थ्यवान आणि देशभक्त प्रधानमंत्री. राष्ट्रीय आणीबाणीने देशाने त्यांना नाकारले, पराभूत केले, म्हणून त्या खचून गेल्या नाहीत. पुन्हा नव्या जोशाने व साहसाने हत्तीवरून प्रचारास सुरुवात करत देशभरात फिरत राहिल्या! माझ्या स्मृतीत घर करून राहिली आहे ती रक्ताने माखलेली, बंदुकीच्या गोळ्यांचे होल्स असलेली साडी...इंदिरा स्मृती, शक्तीस्थळ, तीन मूर्ती भवन येथील कार्यालयीन दफतर, वाचनाची भव्य लायब्ररी आणि मी घेऊन आलेलो रायटिंग पॅड, सोबत असते नेहमी. अशी कोणती गोष्ट आहे, जी इंदिराजींना अमेरिकी साम्राज्यवादाशी संघर्ष करण्यात ताकद देत राहिली, अलिप्त राष्ट्रांची चळवळ यशस्वी करत राहिली, खोडकर पाकिस्तानला सज्जड धडा शिकवू शकली!! जगातील सर्व महत्वच्या घडामोडींवर भारताने भूमिका घेतली, नव्हे नव्हे नेतृत्व केले आहे, या काळात... स्वपक्षातील अंतर्गत कुरघोड्यांवर यशस्वी मात करणाऱ्या, सीआयएने पेरलेल्या कारवायांना शिताफीने परतवून लावणाऱ्या, देशवासीयांच्या हितांचा विचार समोर ठेवणाऱ्या, इंदिराजी आजही देशाच्या विविध भागात "इंदिरा माय!", "इंदिरा अम्मा!" या मायेच्या नावांनी समस्त भारत वासीयांच्या आजही आठवणीत आहेत.

असीम शौर्य, धीरोदात्तपणे देशाच्या हिताचा विचार करून राज्यकारभार पाहणारी सुलताना रझिया नंतर देशाचा कारभार हातांमध्ये घेतलेल्या, उत्तम प्रशासक असलेल्या इंदिराजी गांधी या जयंती - पुण्यतिथी यांच्याहून मोठ्या व महत्वाच्या आहेत... देशाला व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला योग्य वेळी इंदिरा गांधींचे महत्व, कार्य आणि अतुल्य साहस यांचा अंगीकार करत देशभक्तीची सर्वोच्च कसोटी असलेल्या त्याग व बलिदानाने ओतप्रोत असलेल्या, पूर्णवेळ सेवा, त्याग आणि कर्तव्य या त्रिसूत्रीतून भविष्याला सामोरे जावे लागणार आहे. विनम्र अभिवादन!! "I am Courage" - Indira Gandhi

🌹🌹🌹 #शक्ती #IndiraGandhi

Similar News