आधीच कुष्ठरोगासारख्या आजारानं त्रस्त असलेल्या कुष्ठरोग्यांच्या नशिबी कायम दुःखच असल्याचं दिसतंय. सोलापूरमध्ये कुष्ठरोगातून पूर्णपणे बाहेर पडलेल्या रूग्णांनी स्वतःची वस्ती स्थापना केली. आपल्या मुलांना उच्चशिक्षित केलं. मात्र, तरीही केवळ कुष्ठरोग्यांची मुलं म्हणून या उच्चशिक्षित मुलांनाही समाजाकडून वाईट वागणूक मिळतेय. एकूणच सोलापूरच्या जीवन विकास नगर कुष्ठ वसाहतीच्या प्रश्नांचा आढावा घेतलाय मॅक्स महाराष्ट्रच्या प्रतिनिधी प्रियदर्शिनी हिंगे यांनी ‘वस्ती रिपोर्ट’मधून.
कुष्ठरोग्यांचं रूग्णालय...
1905 मध्ये सोलापूर इथं जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या माध्यमातून कुष्ठरोग्यांसाठी स्वतंत्र रूग्णालयाची स्थापना झाली. त्यावेळी या रूग्णालयात ३५० कुष्ठरोगी होते. सुमारे १२५ एकर परिसरात रुग्णालय, शेती होती. शेतीसाठी १६ बैलजोड्या, ८ गायी, ६ म्हशी आणि कुष्ठरोग्यांचं वस्तीघर होतं. १९८४ मध्ये हे सर्व महापालिकेच्या ताब्यात गेलं. त्यावेळी या रूग्णालयात ११० रूग्ण होते. सध्या या रूग्णालयात ७४ रूग्ण आहेत. याच रूग्णालयातून पूर्णपणे बाहेर पडलेल्या रूग्णांनी १९६० मध्ये जीवन विकास नगर कुष्ठ वसाहतीची स्थापना केली.
कुष्ठरोग्यांची वसाहतही आजारीच...
महाराष्ट्रात आजमितीस कुष्ठरोग्यांच्या ५६ वसाहती आहेत. त्यापैकीच सोलापूरची ही एक वसाहत आहे. या आजारातून पूर्णपणे बरे झाल्यानंतरही समाज आपल्याला स्विकारणार नाही, या जाणिवेतूनच रूग्णालयाच्या शेजारीच रूग्णांनी जीवन विकास नगर या नावाची वस्ती करायला सुरूवात केली. आज या वस्तीची लोकसंख्या १३८५ झाली आहे. सुरूवातीला ४ झोपड्या वस्तीत होत्या आज तिथं ३०० घरं आहेत. रूग्णालयातून पूर्णपणे बरा झालेला रूग्ण याच वस्तीत कुटुंबासहित राहतो.
या वस्तीत पिण्याच्या पाण्याची कमतरता, सांडपाण्याची विल्हेवाट लावणारी यंत्रणा नाही, घरांची स्थिती अतिशय वाईट आहे तसेच रुग्णालयात आवश्यक असलेल्या औषधांचीही कमतरता आहे. यात रुग्णालयाच्या जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्या बरोबरच काही आमदार व नगरसेवकांनी मिळून जमिनी परस्पर विकल्या आहेत. बनावट कागदपत्रे तयार करुन या जमिनी विकण्यात आल्या.
कुष्ठरोग्यांच्या पाल्यांना अपमानास्पद वागणूक...
निवडणूका जवळ आल्या की रुग्णांच्या खांद्यावर हात ठेवत फोटो काढतात, मात्र त्यानंतर कोणीही इकडे फिरकत नाही. या वस्तीत ११३५ मतदार आहेत. सर्वांनी नोटाला मतदान करणार असल्याचं ठरवलं होतं. कुठलेही कुष्ठरोगींचे प्रश्न सुटलेले नाहीत त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे महात्मा गांधी कुष्ठरोग बहुउद्देशीय पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष अंबादास नडगिरे यांनी सांगितले. कल्याण, डोंबिवली, पिंपरी-चिंचवड या महानगरपालिकेत कुष्ठरोगींना नोकरी दिली जाते. मात्र, सोलापुरमध्ये याबाबत कोणीही लक्ष घालत नाही. या रुग्णांची मुलं वैद्यकीय, अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेली आहेत. उच्चशिक्षण घेऊनही केवळ कुष्ठरोग्यांची मुलं म्हणुन त्यांना हाकलून दिले जाते. त्यामुळे शिक्षण असुनही बेरोजगारी या वसाहतीत वाढतेय आहे. रुग्णालयातील घर १९०५ मध्ये बांधलेली आहेत तेव्हापासून ती घरं तशीच आहेत. आमदार, नगरसेवक किमान येतात खासदार तर आजपर्यंत आलेलच नाहीत इकडे. घरे बांधुन देवू म्हणतात मात्र होत काहीच नाही.
आधीच अडचणींचा सामना करणाऱ्या कुष्ठरोग्यांची वस्ती, त्यांच्या उच्चशिक्षित पाल्यांना दिली जाणारी अपमानास्पद वागणूक याकडे समाज आणि यंत्रणांनी सहानुभूतीपूर्वक पाहण्याची गरज आहे.