पुरुषप्रधानता आणि नवभांडवलशाहीची स्त्रियांविरुद्ध युती उगाच नाही झाली ! सामाजिक व आर्थिक दोन दगडांच्या जात्यात जर कोणाचे पीठ पीठ होत असेल तर ते स्त्रियांचे होत आहे. सर्वच धर्म मार्तंडानी त्यांना साधे शिक्षण देखील नाकारले; कुटुंबात, समाजात दुय्यम स्थान दिले. त्यांच्यावर नाना प्रकारची बंधनं घातली. जात, धर्म, पंथ, यांच्या असंख्य रूढी, परंपरा, व्रते, बारामहीने काहीबाही धार्मिक विधी / सन यातच स्त्रिया खपत राहिल्या. त्या अजूनही खपतच आहेत.
या सगळ्याचा परिणाम त्यांचा आत्मविश्वास कमकुवत होण्यात झाला, स्वतंत्र विचार करण्याची शक्ती खच्ची करण्यात झाला.
(हे सगळे झुगारून देणाऱ्या स्त्रिया होत्या, आहेत; त्यावर मात करून आत्मविश्वासाने, स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या स्त्रिया होत्या, आहेत, पण संख्येने कमी)
याचमुळे स्त्रिया धार्मिक / जातीय संरचना काय आहे? त्याची मुळं कशात आहेत, आपण सर्व स्त्रिया पीडित आहोंत. तर आपण एकत्र का नाही यायचे? असे विचार करू शकल्या नाहीत. ज्या विचारवंतांनी / नेत्यांनी हा विचार बोलून दाखवला. त्यांना त्यांनी हवीतशी साथ दिली नाही.
स्त्रियांची स्वतंत्र विचार करण्याची शक्ती खच्ची करून त्याच पायावर आधुनिक भांडवलशाही उभी केली गेली आहे. भांडवलशाहीच्या विशिष्ट आर्थिक संरचनेमुळे मानवी अस्तित्वाचे कोणते गंभीर प्रश्न तयार होतात ?
हे ही वाचा
इराण- अमेरिका संघर्ष, कुणाचा तोटा, कुणाचा फायदा?
रवीश कुमार यांचा ब्लॉग : आपल्याच देशातील आठ राज्यांमध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना जाता येत नाही
इराण- अमेरिका संघर्ष, कुणाचा तोटा, कुणाचा फायदा?
आयुष्यभर राबवून देखील एक स्वतःचे छोटे घर न घेऊ शकण्याचा पिण्याच्या पाण्याचा; रात्री अपरात्री, अंतरावरून पाणी भरण्याचा, मुलांच्या शिक्षणाचा, शहरातील दूषित हवा, पाण्यामुळे मुलं, घरातल्यांच्या आजारपणाचा, महाग झालेल्या आरोग्यसेवांचा, नोकऱ्या नसल्यामुळे, शेतीतुन काही निघत नसल्यामुळे आयुष्यात पराभूत झाल्याची भावना, आयुष्यभर पोखरत राहणाऱ्या, त्यांच्यापैकी काहींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
या साऱ्या प्रश्नांमुळे सर्वात जास्त पिचल्या कोण जातात? तर त्या स्त्रियाच! आणि या साऱ्या प्रश्नांना साऱ्या ताकदीनिशी २४ तास ३६५ दिवस तोंड देतात. पण “व्यवस्थेला” प्रश्न मात्र विचारत नाहीत. भांडवलशाहीची राजकीय अर्थव्यवस्था कशी चालते? शासन म्हणजे काय? सार्वजनिक म्हणजे काय ? आपण आणि आपला नवरा बारा तास काम करतो आणि आपल्या श्रमाला एवढीच किंमत ? ती कोण ठरवते ?
या प्रश्नाची उत्तरं लाखो करोडो स्त्रियांनी शोधायला सुरुवात केली की आधुनिक भांडवलशाहीचे धाबे धणाणेल !
असे झाले तर आज जग डोक्यावर उभे आहे ते पायावर उभे राहील !
मी वाट बघतोय स्त्रिया भांडवलशाहीची राजकीय अर्थव्यवस्था समजून घेण्याची !
संजीव चांदोरकर