राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यानिमित्त आपल्या फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये त्यांनी नाव न घेता भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर टिका केली आहे. याआधी दसरा मेळाव्या दिवशी होणाऱ्या भाषणाला महंत नामदेव शास्त्री यांनी परवानगी नाकारली होती, व त्यासाठी पंकजाजींनी आपली राजकीय प्रतिष्ठा देखील पणाला लावली होती. गेल्यावर्षी बीडमधल्या सावरगावात भगवान बाबांच्या जन्मगावी दसरा मेळावा घेण्यात आला आणि यावर्षी पुन्हा त्याच ठिकाणी मेळावा आयोजित करण्यात आल्याने पंकजा मुंडेंनी महंत नामदेव शास्त्री व धनंजय मुंडेंना अप्रत्यक्षरित्या टोला लगावून, समाचार घेतला.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "लोकांना भक्ती आणि शक्तीचा योग्य समन्वय ऊर्जा प्रेरणा आणि आशा देतो. ऊस तोडणाऱ्याच्या कोयत्याला धार, गरीबाच्या स्वप्नाला आधार देतो, हेच मिळत ना दसऱ्याला..आपल्याला, मला आणि तुम्हाला. माझ्या भगवान बाबांच्या दर्शनाने व मुंडे साहेबांच्या भाषणातून एवढी ऊर्जा घेऊन जात होते लोक ती ऊर्जा त्यांच्याकडून हिरावून घेणे अशक्यच. ही अशक्य बाब हिरावून घेण्याचा प्रयत्न झालाच. हे उद्ध्वस्त करण्याचा डाव ही आखला गेला पण कोणी आपल्यावर वार केला तर त्यांच्यावर प्रतिवार करण्यात माझी सर्व शक्ती मी का लावू? त्यापेक्षा मी नवा डाव मांडून माझ्या लोकांना सुरक्षित व शांत ठेवणे मला क्रमप्राप्त वाटले. आपले शब्द दूषित करुन कोणावर टीकाटिप्पणी करण्यापेक्षा निर्मितीवर मी जोर देते आणि त्या दिशेने मी वाटचाल ठरवली आहे."