राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज थेट अमेरिकेतील फेसबुक मुख्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत बचतगटाच्या महिलादेखील उपस्थित होत्या. भारतातील महिलांना फेसबुक आणि व्हॉट्सऍप यासारख्या समाजमाध्यमांद्वारे त्यांच्यातील कौशल्य जगासमोर आणावे असे आवाहन पंकजा मुंडेंनी यावेळी केले. त्यांनी बचतगटातील महिलांसमवेत सॅन फ्रॅन्सिस्को येथे फेसबुक मुख्यालय, व्हॉट्स अॅप प्रतिनिधी व टीआयई संस्थेला भेट दिली. या भेटीदरम्यान पंकजा मुंडे यांनी ग्रामीण बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी या दोन्ही माध्यमांचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत काम करण्याचे आवाहन केले. येथील अद्ययावत माहिती घेऊन ग्रामीण भागातील बचतगट हायटेक झाल्याशिवाय राहणार नाहीत, असे देखील त्या म्हणाल्या.
फेसबुक आणि व्हाॅटस अॅप या दोन्ही माध्यमांचे प्रतिनिधी डिसेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत व त्यांनीदेखील या भागीदारीला सहमती दर्शवली आहे.
या भेटीदरम्यान ग्रामीण बचतगटांच्या महिलांनी तयार केलेल्या भारतीय वस्तू अमेरिकेतील लोकांना एक नमुना म्हणून दाखवल्या. व या महिलांनी तयार केलेल्या वस्तू अमेरिकेतील लोकांना इतक्या आवडल्या की त्यांनी त्या खरेदी देखील केल्या. या खरेदी-विक्रिमध्ये या बचतगटाच्या महिलांनी अवघ्या पंधरा मिनिटात ३५ हजार ७०० रूपयांची कमाई केली.