#MeToo सध्या जे काही घडत आहे ते पाहून मला काहीच वाटत नाहीये - हेमा मालिनी
#MeToo मोहिम सुरु झाली आणि अनेक मान्यवरांची नावे समोर आली. अनेकांवर आरोप झाले व त्यावर इतर अनेकांनी आपले मत मांडायला सुरुवात केली. आता या प्रकरणी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आपले मत मांडले आहे. त्या एका ऑटोबायॉग्राफी लॉन्चींगच्या कार्यक्रमावेळी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांसोबत उपस्थित होत्या.
त्यावेळी प्रसारमाध्यमांनी #MeToo मोहिमेबाबत त्यांचे मत विचारले तेव्हा त्या म्हणाल्या की, ‘सध्या जे काही घडत आहे ते पाहून मला काहीच वाटत नाहीये. अनेकांना हे धक्कादायक वाटत असेल परंतु मला तसं काहीच वाटत नाही. यात धक्कादायक असं काहीच नाही. देशभरामध्ये सध्या सारेच जण #metoo विषयी बोलत आहेत. व्यक्त होत आहेत. काही जण महिलांना पाठिंबा देत आहेत. तर काही जण टीकाही करत आहेत. पण या साऱ्यामध्ये महिलांना स्वत:चं रक्षण स्वत:च करावं लागणार आहे. त्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्यात अर्थ नाही. कोणती व्यक्ती कशी आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे’ त्यांच्या या धक्कादायक प्रतिक्रियेनंतर त्या सध्या चर्चेत आल्या आहेत.