पुनर्जन्म : अंगणवाडी सेविका अलका कांबळेंचं प्रसंगावधान, गरोदर मातेने दिला बाळाला जन्म
पनवेल तालुक्यातील आपटा गावातील घटना आहे. अंगणवाडी सेविका अलका अनंत कांबळे या नियमित गृहभेटीकरिता गेल्या होत्या. कोरोना विरोधातील लढाईत राज्यातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका देखील मैदानात उतरल्या आहेत.
गृहभेटीसाठी गेलेल्या अंगणवाडी सेविका अलका कांबळे, मंगल सुनील सीद यांच्या घरी गेल्या. गरोदर असलेल्या मंगल सुनिद यांना प्रसूती वेदना सुरु असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन कांबळे यांनी तात्काळ ऑटोरिक्षा बोलाविली आणि आशा वर्कर सुनिता रमेश जोशी यांना सोबतीला घेऊन मंगल यांना तात्काळ आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
पुढील काही वेळातच आपटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियांका चव्हाण आणि नेहा गांगुर्डे तसेच आरोग्य पर्यवेक्षिका नमिता पाटील, आरोग्य सेविका कल्पना वैष्णव यांनी मंगल यांची वैद्यकीय तपासणी केली व त्यांची यशस्वी नैसर्गिक प्रसूती केली.
मंगलसीदयांची नैसर्गिक प्रसूती होवून त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळ व माता दोघांचीही तब्येत छान आहे. कोरोना विषाणूच्या या संकट काळात सबंध जग हे विलक्षण ताणतणावात असूनही रायगड जिल्ह्यातील या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका व आरोग्य पर्यवेक्षिका यांनी स्वतःच्या कर्तव्याची जाण ठेवून प्रसंगावधान दाखवून एका गरोदर महिलेस एक प्रकारे पुनर्जन्मच दिला आहे.