`झुमका` गिरा रे...
झुमका गिरा रे बरेली के बाजार में असं म्हटलं जातं. पण यामागची कथा काय आहे? याचा वेध घेतला आहे मॅक्स महाराष्ट्रच्या भाग्यश्री पाटील यांनी...;
झुमका शब्द ऐकल्यावर बरेली आठवते. यामागचं कारणही तसंच रंजक आहे. १९६६ मध्ये आलेल्या 'मेरा साया' या चित्रपटातील झुमका गीरा रे बरेली के बाजार में, हे गाणं त्याकाळी खूप गाजलं. राजा मेहंदी अली खान यांनी हे गाणं लिहलं आहे. त्यांना सुचलेल्या या ओळींचा इतिहास म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या आई आणि वडिलांची प्रेमकहाणी. ही प्रचलित गोष्ट तशी सर्वांना माहिती आहे. पण याच झूमक्याविषयी अजून एक तथ्य नसलेली कथा बरेली मध्ये एका शोद्वारे दाखवली जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जाणून घेऊया बरेली शहर या गाण्यानं कसं प्रसिध्दीस आलं आणि सध्या हे शहर का चर्चेत आलं? याचा वेध घेतला आहे मॅक्स महाराष्ट्रच्या भाग्यश्री पाटील यांनी...
ही गोष्ट आहे जेव्हा हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन यांचे लग्नही झाले नव्हते. तेजी बच्चन कविसंमेलनाच्या कार्यक्रमानिमीत्त बरेलीला येत असत. सिव्हिल लाईन्स येथील बाल साहित्यकार निरंकार देव सेवक यांच्या घरीही हरिवंशराय ये-जा करत असत. एकदा तेजी सूरी या बरेलीला येत होत्या. टांग्यातून येताना त्यांचे कानातले पडले आणि आल्या आल्या त्यांनी हा किस्सा सेवकजींच्या निवासस्थानी असलेल्या हरिवंशराय बच्चन यांना सांगितला. हाच किस्सा हरिवंशराय यांनी राजा मेहंदी अली खान यांना सांगितला. त्यांना जे वाटलं त्यावर त्यांनी एक गाणं लिहिलं, ते म्हणजे झुमका गिरा रे बरेली की बाजार में... हे गाणं सुपरहिट झालं. त्यानंतर बरेली इतके प्रसिद्ध झाले की येथील कुतुबखाना बाजार झुमका बाजार म्हणून ओळखला जाऊ लागला.
याच बरेली शहरात स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमीत्त बरेलीतील ऐतिहासिक तुरुंगाच्या भिंतीवर लाइट आणि साउंड शो प्रदर्शित केला जाणार आहे. यामध्ये 'झुमका गिरा रे...' या गाण्याशी संबंधित एक सत्य आहे, ज्याने बरेलीला ओळख दिली. या शो नुसार असं सांगितलं जाणार आहे की, इंग्रजांच्या काळात एक सैनिक होता ज्याला 'झुमका' म्हणत. एके दिवशी बरेलीच्या बाजारातच त्याचा मृत्यू होतो. ही माहिती जेल मधल्या क्रांतीकारकांना पोहचवण्यासाठी "झुमका गीरा रे बरेली के बाजार में "हा कोडवर्ड वापरला गेला. तसं पाहायला गेलं तर ही कहाणी कोणत्याच पुस्तकात नाही मात्र थोडीशी चर्चा होती कि झुमका नावाचा एक शिपाई होता. जो जेलमधील क्रांतिकारकांच्यावर अत्याचार करायचा पण हे खरं कि खोटं याविषयी अधिकृत माहिती मिळाली नाही. पण या शो नुसार असं दाखवलं जाणार आहे की काही कथा या काळानुसार लुप्त होतात. अशाच प्रकारे झुमका नावाच्या शिपायाची कहाणी सुद्धा काळाच्या अंधारात नष्ट झाली आहे.
स्मार्ट सिटी कंपनीने हा शो दिल्लीतील मयूर विहार येथे असलेल्या टेम्फ्लो सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेडकडून तयार केला आहे. याचे दिग्दर्शक बीएम माहेश्वरी सांगतात की, झुमका गिरा रे ची कथा स्मार्ट सिटी कंपनीने प्रदान केली आहे. पण बरेलीचे स्मार्ट सिटी आणि महापालिका आयुक्त अभिषेक आनंद सांगतात, की शोमधील 'झुमका'शी संबंधित सामग्री इंटरनेट आणि विकिपीडियावरून घेण्यात आली आहे.
पण यावर अनेक इतिहासकारक आणि साहित्यिकांनी आक्षेप घेतला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार स्वातंत्र्याशी संबंधित शो मध्ये याप्रकारचे भ्रम पसरवत अशा गोष्टी दाखवू नयेत.
आता हा झुमका तेजी बच्चन यांच्या कानातला होता की, झुमका बरेलीचा शिपाई होता हे निश्चित सांगता येणार नाही.