#गावगाड्याचे इलेक्शन : रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्त गावांमध्ये दिग्गजांना फटका?
रिलायन्स नागोठणे प्रकल्पाविरोधात प्रकल्पग्रस्त गेल्या दीड महिन्यापासून ठिय्या मांडून बसले आहेत. आता या आंदोलनाचा फटका ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शेकपापला बसू शकतो का याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कौस्तुभ खातू यांनी....;
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला एक महिना उलटून गेला आहे. या आंदोलनाची दखल सर्वत्र घेतली जात आहे. पण गेल्या 41 दिवसांपासून सुरू असलेल्या महाराष्ट्रातील एका आंदोलनची दखल सरकारने घेतलेली नाही. रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्तांनी कंपनीच्या गेटसमोर 1 महिन्यापेक्षा जास्त काळापासून ठिय्या मांडला आहे. आसपासच्या 10 गावांमधील प्रकल्पग्रस्त इथे आबाल वृद्धांसह ठिय्या देऊन आहेत.
सध्या राज्यभरात 14 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या आंदोलनाचा इथल्या ग्रामपंचायत निवडणुकांवर काय परिणाम होणार याचे चाचपणी जेव्हा आम्ही केली तेव्हा, केवळ 10 गावे नाहीत तर या आंदोलनाला इतर अनेक गावांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील दोन मोठे नेते खासदार सुनिल तटकरे आणि शेकापचे जयंत पाटील यांची प्रतिष्ठा या आंदोलनामुळे पणाला लागली आहे.
बेनसे, झोतिर्पाड़ा, शिहू, आंबेघर, वेलशेत, चोले, गांधे, शेताजुई, जांभुळटेप, आणि नागोठणे या 10 गावातील लोक आंदोलन करत आहेत. या आंदोलनात सर्व सहभागी असले तरी त्या गावांचे सरपंच मात्र इथे दिसत नाहीयेत. या सर्व लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियांवरून असे लक्षात आले की या 10 गावच्या 10 सरपंचांनी स्थानिक राजकरण लक्षात घेऊन लेखी पाठिंबा दिला आहे. परंतू ते या आंदोलनात सहभागी होत नाहीत कारण कंपनीतील कंत्राटं धोक्यात येतील, अशी भीती त्यांना असल्याची इथे चर्चा आहे.
याच राजकारणामुळे इथल्या तरुणांनीही आता राजकारण्यांना धडा शिकवण्याचा निर्धार या आंदोलनात बसून अभ्यास करणाऱ्या एका तरुणीने दिला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी या 10 गावांपैकी 8 गावांमध्ये राष्ट्रवादी आणि शेकापची युती आहे, तर दोन ठिकाणी शिवसेना स्वबळावर लढणार आहे. पण याचबरोबर रायगड जिल्ह्यातील इतर प्रकल्पग्रस्तांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने आता ग्रामपंचायत निवडणुकीत याचे कसे पडसाद उमटतात ते निलानंतर स्पष्ट होईल.