Oil Price : खाद्य तेलाचे भाव का वाढले?

गेल्या अनेक दिवसांपासून खाद्यतेलाच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. पण खाद्यतेलाचे भाव किती वाढले आहेत? खाद्यतेलाचे दर वाढण्याचे कारण काय? याविषयी भरत मोहळकर यांचा रिपोर्ट..

Update: 2022-03-18 13:13 GMT

कोरोना महामारीपाठोपाठ रशिया आणि युक्रेन युध्द सुरू आहे. या युध्दाचा संपुर्ण जगावर परिणाम होत आहे. त्यातच आपल्या घरातील खाद्यतेलाच्या दरावरही त्याचा मोठा परिणाम होत आहे. तर हा परिणाम नेमका कसा होत आहे? खाद्यतेलाचे दर का वाढत आहेत? भारत किती खाद्यतेल आयात करतो? याबाबत माहिती पाहूयात...

भारत इंधनासह खाद्यतेलाबाबतीतही स्वयंपुर्ण नाही. भारताला खनिज तेलांसह खाद्यतेलही परदेशातून आयात करावं लागतं. आपल्या देशाच्या एकूण गरजेपैकी अवघे 15 टक्के खाद्यतेलाचे उत्पादन देशात होते. तर 85 टक्के खाद्यतेल आणि तेलबियांची आयात इंडोनेशिया, मलेशिया, अर्जेंटिना, ब्राझील आणि युक्रेन व रशियातून केली जाते. त्यापैकी इंडोनेशिया आणि मलेशियातून पामतेल आणि अर्जेंटिना व ब्राझील या देशांतून सोयाबीन तर युक्रेनमधून सुर्यफुल तेलाची आयात केली जाते. पण सध्या ज्या युक्रेनमधून भारत 18 ते 22 टक्के खाद्यतेलाची आयात करतो. त्याच युक्रेनमध्ये युध्द सुरू आहे. त्यामुळे 80 टक्के खाद्यतेल युक्रेनच्या बंदरावर अडकून पडले आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे.

दुसरीकडे रशिया आणि युक्रेन युध्दामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फायदा उचलण्यासाठी इंडोनेशियाने भारताला करण्यात येणारी आयात थांबवली आहे. तर मलेशियामध्ये निर्माण झालेल्या मजूर टंचाईमुळे पाम तेलाच्या उत्पादनात घट झाली आहे. याचा थेट परिणाम भारतात खाद्यतेलाच्या दरामध्ये वाढ होण्यात झाला आहे. पण ही वाढ नेमकी किती आहे?

खाद्यतेलाच्या दरात झालेली वाढ-

20 जानेवारी 2022 रोजी 15 किलोच्या सोयाबीन तेलाच्या डब्याची किंमत 2100 रुपये इतकी होती तर आता त्यात वाढ होऊन 2500 रुपये झाली आहे. 20 जानेवारी ला शेंगदाने तेलाची किंमत 2260 रुपये होती ती आता 2600 रुपये इतकी झाली आहे. सुर्यफुल तेलाची किंमत 2100 रुपये होती ती आता 2410 रुपये इतकी झाली आहे. राईस ब्रँडची किंमत 2100 रुपये होती ती आता 2460 रुपये इतकी झाली आहे. याबरोबरच रशिया युक्रेन युध्दाच्या पार्श्वभुमीवर खाद्य तेलाच्या दरात 28 ते 35 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. तसेच युक्रेन आणि रशियात गव्हाचे सर्वाधिक उत्पादन होत असले तरी अजूनतरी गव्हाचे दर स्थिर आहेत.

नेमकं कारण काय?

रशिया युक्रेन युध्दाचा सोयाबीन आणि सुर्यफुलाच्या तेलाच्या आयातीवर मोठा परिणाम होत आहे. गेल्या दीड महिन्यात खाद्य तेलाच्या दरात तब्बल 25 रुपये किलो इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी तेलाची फोडणी महागली आहे. इंडोनेशियाने पामतेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मलेशियात मजूर टंचाई कायम आहे. त्यामुळे पाम तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ब्राझील आणि अर्जेंटिनात सोयाबीन तेलाच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे आगामी काळात देशात मोठ्या प्रमाणावर तेलाचे दर वाढण्याची शक्यता आहे.

मात्र दुसरीकडे युध्द सुरू असल्याचे कारण सांगून खाद्यतेलाची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. त्याचाही फटका सर्वसामान्यांना बसतो. 

Full View

Tags:    

Similar News