घटनात्मक पदावर असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना राज्यपालांनी एका विशिष्ट धर्माचे काम करा, असा सल्ला देणाऱे राज्यपाल लोकशाहीला बांधील आहेत की, धर्मराष्ट्राला असा सवाल लोकशाहीर संभाजी भगत यांनी केला आहे. ज्या राज्यपालांवर लोकशाहीच्या घटनात्मक मुल्यांच्या रक्षणाची जबाबदारी आहे. त्याच राज्यपालांनी कुंपनानं शेत खाल्याप्रमाणे नियम मोडले असल्याची टीका संभाजी भगत यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण?
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद महाराष्ट्राला नवीन नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील प्रार्थनास्थळं बंद ठेवण्यात आली आहेत.
भाजप, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी मंदीर उघडण्यावरुन महाविकास आघाडी सरकारला लक्ष करत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या वादात उडी घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र लिहून मंदीरं उघडण्याची मागणी केली होती.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहून माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे. हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. असं म्हणत राज्यपालांना खास ठाकरे शैलीत उत्तर दिलं आहे.