कोरोनाबाधिताच्या कुटुंबाकडून मृत्यूनंतरही उकळले पैसे

मयताच्या टाळूवरचे लोणी खाणे हा वाक्यप्रचार आजवर तुम्ही फक्त ऐकला असेल, परंतु याची सत्यता दर्शविणारी घटना नुकतीच नांदेड शहरात पाहायला मिळाली.;

Update: 2021-05-20 17:19 GMT

नांदेड: मयताच्या टाळूवरचे लोणी खाणे हा वाक्यप्रचार आजवर तुम्ही फक्त ऐकला असेल, परंतु याची सत्यता दर्शविणारी घटना नुकतीच नांदेड शहरात पाहायला मिळाली. नांदेडच्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचे बिल वाढविण्यासाठी डॉक्टरने एका कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णावर मृत्यूनंतरही उपचार सुरू ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड शहराच्या सिडको भागातील विणकर कॉलनीत राहणारे शिक्षक अंकलेश पवार यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना गोदावरी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण डॉक्टरांनी निष्काळजीपणा करत त्यांना वेळेवर रेमडीसीव्हर आणि योग्य उपचार न करता केवळ बिलाची सतत मागणी केली, आणि याच काळात पवार यांचा मृत्यू झाला असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

पुढे, हॉस्पिटल आणि डॉक्टर एवढ्यावरच थांबले नाही, तर पवार यांचा 21 तारखेला मृत्यू झाल्यावरही केवळ पैसे उकळण्यासाठी त्यांचा मृत्यू 24 एप्रिल रोजी हॉस्पिटलकडून घोषित करण्यात आला. त्यानंतर मयत शिक्षक पवार यांच्या पत्नी शुभांगी पवार यांनी न्यायालयात धाव घेत दाद मागितली. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने संबंधित गोदावरी हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून त्यानुसार शिवाजीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकीकडे अनेक डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून कोरोना बाधित रुग्णांना चांगली सेवा देत त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे तोंडाला पैशांचा रक्त लागलेले काही डॉक्टर आणि रुग्णालय आपला गल्ला भरण्याच्या धुंदीत माणुसकीही विसरले आहे.

Full View
Tags:    

Similar News