माध्यमांच्या सद्यस्थितीवर भाष्य करणारा पत्रकारांचा परिसंवाद

एकीकडे माध्यमांचा आवाज दाबला जात आहे. पत्रकारांना निर्भीडपणे वार्तांकन करता येत नाही. त्यापार्श्वभूमीवर मॅक्स महाराष्ट्रने माध्यमांच्या सद्यस्थितीवर भाष्य करणाऱ्या पत्रकारांचा परिसंवाद आयोजित केला होता. यामध्ये पत्रकारांनी आपल्याला येणाऱ्या अडचणी व्यक्त केल्या आहेत. नक्की पहा कलम के सिपाही....;

Update: 2023-06-17 16:28 GMT

पत्रकारितेवर भाडंवलशाही, सत्ताधाऱ्यांचं वर्चस्व वाढत आहे. अशा परिस्थितीत जी स्वतंत्र माध्यमं आहेत, त्यांच्या पाठिशी वाचक-प्रेक्षक म्हणून समाजानंही उभं राहून त्यांना पाठबळ दिलं पाहिजे, असा सूर मॅक्स महाराष्ट्र आणि महापरिवर्तनवादी पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित ‘कलम के सिपाही’ या परिसंवादात उमटला.

परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर उपस्थित होते. यावेळी न्यूज स्टेट महाराष्ट्र-गोवा चे वरिष्ठ प्रतिनिधी विलास आठवले यांनी त्यांचा जीवनप्रवास मांडला. १९७२ च्या दुष्काळात आठवले यांचं कुटुंब मुंबईतल्या विक्रोळीत स्थायिक झालं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आठवले कुटुंब राहत होतं. पाठिशी फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची शिदोरी होती. त्या शिदोरीवरच विलास आठवले यांनी पत्रकारितेची वाटचाल सुरू केल्याचं यावेळी सांगितलं.

मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी सागर गोतपगार यांनीही यावेळी ग्रामीण भागात पत्रकारिता करतांना आलेले अनुभव मांडले. गडचिरोलीमध्ये अस्वलाच्य हल्ल्यात एका महिलेचे दोन्ही पाय निकामी झाले होते. त्या बातमीसाठी सागर यांनी मुख्य प्रवाहातील सर्व माध्यमांना माहिती दिली. मात्र, माध्यमांनी त्या बातमीची दखलच घेतली नाही. त्यामुळं अस्वस्थ परिस्थितीत सागर यांनी मॅक्स महाराष्ट्रसोबत आपला प्रवास सुरू केल्याचं सांगितलं. टिव्हीवर किंवा वृत्तपत्रात दाखवला जाणारा भारत आणि प्रत्यक्ष दिसणारा भारत वेगळाच आहे, ग्रामीण भागात फिरतांना हा फरक स्पष्टपणे जाणवतो, अशी खंत सागर यांनी व्यक्त केली.

साप्ताहिक वज्रधारी चे संपादक दत्तकुमार खंडागळे यांनी त्यांच्या खास शैलीत सरकार आणि मुख्य माध्यमातील हुजरेगिरीवर आसूड ओढले. भारत विश्वगुरू झाल्याच्या थापा मारल्या जात आहेत. कोरोनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्यांना दिवे लावायला सांगितले. तर दुसरीकडे त्याचवेळी कित्येक घरात चुली पेटल्या नव्हत्या, या विसंगतीवरही खंडागळे यांनी खंत व्यक्त केली. समाज विकाऊ असेल तर त्याचे अपत्य असलेली माध्यमं, नेते कसे प्रामाणिक राहतील, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जाहिराती न घेता बातम्या लावणाऱ्या माध्यमांच्या पाठिशी समाज किती उभा राहतो, असा प्रश्न खंडागळे यांनी उपस्थितांना विचारला. मॅक्स महाराष्ट्र आणि वज्रधारी सारख्या स्वतंत्र विचारसरणीच्या माध्यमांशी समाजानं उभं राहणं हे त्यांचं नैतिक कर्तव्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

दैनिक लोकसत्ताचे रायगड जिल्हा प्रतिनिधी हर्षद कशाळकर यांनीही यावेळी ग्रामीण भागात पत्रकारिता करतांना आलेले अनुभव सांगितले. ग्रामीण भागातली पत्रकारिता ही शहरी भागातील पत्रकारितेपेक्षा अधिक आव्हानात्मक असल्याचं ते म्हणाले. ग्रामीण भागात पत्रकारिता करतांना मर्यादित साधनं, मर्यादित सुविधा असतात, अशा परिस्थितीतही ग्रामीण भागातले पत्रकार पोटतिडकीने लोकांचे प्रश्न मांडत असल्याचं कशाळकर यांनी सांगितले.

मॅक्स महाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर यांनी सध्याच्या पत्रकारितेवर आपली रोखठोक भुमिका मांडली. साधारणतः २५ वर्षांपूर्वी जेव्हा पत्रकारितेला सुरूवात केली. तेव्हा पत्रकारांना, पत्रकारितेला मानसन्मान होता. मात्र, आता परिस्थिती ही “पहले छपकर बिकते थे, अब बिककर छपते है” पर्यंत आल्याची खंत आंबेकर यांनी यावेळी व्यक्त केली. मुख्य प्रवाहातील माध्यमांमधून संपादकीय भुमिकाच गायब झाली आहे. वृत्तवाहिन्यांवर डिबेट करायला संपादक घाबरत आहेत. प्रेस फ्रीडम अर्थात माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या यादीत आपला देश १४० व्या क्रमांकावर आहे. कित्येक पत्रकार वर्षानुवर्षे किरकोळ आरोपांमुळं तुरूंगात खितपत पडलेले आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रातला सलोखा संपत चाललाय. अस्थिरता, संदिग्धता आणि संशयाचं वातावरण सगळीकडे दिसतंय, माध्यमं पण यापासून दूर नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालले आहेत. त्यांना पुरेसं मानधन दिलं जात नाही. पुर्वी एका बातमीसाठी पत्रकाराला साधारणपणे तीन हजार नंतर अडीच, दोन, एक हजार रूपये मानधन म्हणून दिले जात होते. आता त्याच पत्रकारांना प्रत्येक बातमीसाठी ८० रूपये मानधन दिले जाते. हे एकमेव क्षेत्र असेल जिथं श्रमाचा मोबदला हा वरून खाली आला आहे, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. पुर्वी जसा इथल्या संतांचा विठ्ठलासोबत वाद होता. तसाच वाद आमच्यासाठी विठ्ठल असलेल्या प्रेक्षक-वाचकांशी आमचा आहे. त्यांनी आमच्यासारख्या स्वतंत्र विचारसरणीच्य माध्यमांना पाठबळ दिलं पाहिजे.

देशात द्वेषाचा अजेंडा पसरविणारे दिल्ली जवळच्या नोएडा आणि मुंबईतल्या टीव्ही चॅनेल्सचे स्टुडिओ जेव्हा लोकं उध्वस्त करतील, तेव्हा देशात नवी क्रांती होईल, असं परखड मत रवींद्र आंबेकर यांनी यावेळी व्यक्त केलं. नोएडा आणि मुंबईतले हे स्टुडिओ उध्वस्त होतील, तेव्हाच देशात शांतता प्रस्थापित होऊन लोकशाही सुदृढ होईल, असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी मॅक्स महाराष्ट्रच्या निवेदिका भाग्यश्री पाटील यांनी या परिसंवादाचं सूत्रसंचालन केलं.

Full View

हे ही पहा....


Full View

Tags:    

Similar News