डॉ. बाबासाहेब हा आयटम साँगचा विषय नसून वैचारिकतेचा विषय: उत्कर्ष शिंदे
महाराष्ट्रातील तरुणांना प्रेरणा देणारी गायक डॉ. उत्कर्ष शिंदे यांची मॅक्समहाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी घेतलेली मुलाखत
"खुली हवा में उडते है पंछी
दिन में अंधेरा छाया है
कैद हुआ इन्सा घर में"
वक्त ये कैसा आया है" हे नवीन गीत आहे. शिंदे घराण्याचे गायक डॉ. उत्कर्ष शिंदे यांचं. सध्या लोक जीवन आणि मरणाच्या संघर्षात अडकले आहेत. या जीवनमरणाच्या संघर्षावर डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी समर्पक भाष्य केलं आहे. अलिकडे सामाजिक जाणीवांपेक्षा पॉप, हित हॉल अशीच गाणी टीव्हीच्या मोबाइलच्या पडद्यावर पाहायला मिळतात. यामुळं नव्या पिढीचे गायक असलेल्या उत्कर्ष शिंदे यांना वाईट वाटतं. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त नवीन पिल्ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर कसे भावतात? प्रत्येक क्षेत्रातील नवीन पीढी बाबासाहेबांच्या विचारांबाबत काय विचार करते? या संदर्भात मॅक्समहाराष्ट्रने प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींशी चर्चा केली. मॅक्समहाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांच्याशी चर्चा करताना उत्कर्ष यांची सामाजिक जाणीवांची नाळ किती घट्ट आणि भक्कम आहे. याची जाणीव आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही.
खरं तर ज्या इमारतीचा पाया शिंदेशाही सारख्या भक्कम विटेवर उभा आहे. त्या ठिकाणी सामाजिक जाणीवांबाबत भाष्य होणं साहजिकच आहे. उत्कर्ष सांगतात…
आंबेडकरी चळवळीतील गाण्यांचा एक वेगळाच इतिहास आहे. बहुजन समाजात प्रबोधनकारी गीत, जलसा, संगीत याला खूप महत्त्व आहे. दलित ओळख, आत्मसन्मान आणि सत्तासंघर्ष याची सुरुवात संगीत आणि गाण्यांमधून झाली.
लोकशाहीर वामनदादा कर्डक यांचे प्रबोधनकारी गाणे आजही काळजाला धस्स करुन जातात. गुलामगिरी आणि अन्यायाविरोधात बंड करणारी शब्दांची मांडणी पुर्वीच्या लेखणीत आजही दिसून येते. परंतु सध्याच्या नव्या पिढीतील आंबेडकरी गाणे ही अभ्यास पूर्वक नाही.
पूर्वीच्या लेखणीला जी धार आहे. ती आजच्या काळातल्या लेखणीला नाही. आंबेडकरी गाणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा आयटम साँगचा विषय नसून वैचारिकतेचा विषय असल्याचं परखड मत उत्कर्ष व्यक्त करतात….
यंदाची जयंती मोठ्याप्रमाणात सार्वजनिकरित्या साजरी करता येणार नसून करोना काळातली भीमजयंती आपल्या घरातच साजरी करावी लागणार आहे. त्यामुळं कोरोना काळातली जयंती घरातच साजरी करा. असं आवाहन डॉ. उत्कर्ष शिंदे यांनी केलं आहे.
पाहा सामाजिक जाणीवांची जाणीव करून देणारी, आणि बाबासाहेबांच्या विचाराला जागवणारी मुलाखत…