एकनाथ शिंदे यांना 'डबल इंजिन' चा धक्का, जाहिरातीला करावा लागला डबल खर्च

शिंदे-भाजप सरकारमध्ये नाराजी असल्याची चर्चा रंगलीय. त्यातच एकनाथ शिंदे यांनी आपण देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त पॉप्युलर असल्याची जाहिरात प्रसिध्द केली. त्यात देवेंद्र फडणवीस यांनाच बायपास करण्यात आल्याने भाजपच्या गोटात नाराजी पसरली होती. मात्र आता डबल इंजिनने एकनाथ शिंदे यांनाच धक्का दिलाय. नेमकं काय घडलंय नक्की पहा स्पेशल रिपोर्ट मध्ये...;

Update: 2023-06-14 16:30 GMT

शिंदे-भाजप सरकारमध्ये नाराजी असल्याची चर्चा रंगलीय. त्यातच एकनाथ शिंदे यांनी आपण देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त पॉप्युलर असल्याची जाहिरात प्रसिध्द केली. त्यात देवेंद्र फडणवीस यांनाच बायपास करण्यात आल्याने भाजपच्या गोटात नाराजी पसरली होती. मात्र आता डबल इंजिनने एकनाथ शिंदे यांनाच धक्का दिलाय. नेमकं काय घडलंय नक्की पहा स्पेशल रिपोर्ट मध्ये...

शिवसेनेने प्रसिध्द केलेल्या जाहिरातीत नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या कल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या सर्व्हेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अव्वल स्थान मिळवल्याचे म्हटले होतं. मात्र या जाहिरातीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो गायब होता. त्यामुळे भाजपने यासंदर्भात प्रतिक्रीया देतांना पॉप्युलर कोण हे सर्व्हेमधून नाही तर निवडणूकीत समजत असल्याची प्रतिक्रीया दिली होती.

सर्व्हेत नेमकं काय?

1)भाजपला 30.2 तर शिवसेनेला 16.2 टक्के लोकांचा कौल

2) एकनाथ शिंदे यांना 26.1 तर देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के लोकांची पसंती

3)वर्तमानपत्रातील जाहिरातीत पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांचाच फोटो

4)जाहिरातीतून देवेंद्र फडणवीस यांचा फोटो होता गायब

5) बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, अमित शहा यांचाही फोटो होता गायब

शिवसेनेच्या जाहिरातीत एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त पॉप्युलर असल्याची जाहिरात दिल्यानंतर आता अखेर एकनाथ शिंदे यांनी दुसरी जाहिरात प्रसिध्द केलीय. यामध्ये मात्र जाहिरातीचा सूर बदलल्याचं पहायला मिळतंय. 

या जाहिरातीत नेमकं काय?

1)  जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा

2) जनतेचा कौल शिवसेना, भाजप युतीलाच

3) 49.3 टक्के शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाला कौल

4) प्रमुख विरोधी पक्षांना 26.8 तर इतरांना 23.9 टक्के कौल

याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचया नेतृत्वाला 84 तर डबल इंजिन सरकारमुळे राज्याचा विकास होत असल्याचे 62 टक्के नागरिकांना वाटत आहे, असा दावा या जाहिरातीत करण्यात आलाय. या नव्या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आता घेण्यात आलाय. त्याबरोबरच शिवसेनेच्या मंत्र्यांचेही फोटो या जाहिरातीत झळकले आहेत. त्यामुळे या वादावर पडदा पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या दुसऱ्या जाहिरातीवरूनही संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय.

आपणच देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त पॉप्युलर असल्याची जाहिरात एकनाथ शिंदे यांनी दिली होती. मात्र त्यानंतर पडद्यामागे घडलेल्या घडामोडीत एकनाथ शिंदे यांना डबल इंजिनने धक्का देत डबल खर्च  करायला लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे पहिल्या जाहिरातीत फोटो न टाकल्याने निर्माण झालेल्या वादानंतर एकनाथ शिंदे यांना दुसरी जाहिरात प्रसिध्द करावी लागल्याने देवेंद्र फडणवीस यांनी आपणच सुपर डीसीएम असल्याचं स्पष्ट केलंय.

Full View


Tags:    

Similar News