दरवर्षी प्रमाणे दिवाळीचा सण आला आहे. दिव्यांच्या उत्सवासाठी सोलापूरातील बाजार पेठा सजल्या आहेत. यामध्ये विविध प्रकारचे आकाश कंदील देखील विक्रीस उपलब्ध झाले आहेत. आतापर्यंत आपण विविध प्रकारचे प्लॅस्टिक आणि कागदाचे आकाश कंदील पाहीले असतील, पण माती पासून बनवलेले आकाश कंदील कधी पाहिले आहेत का? नाही ना... मग चला तर पाहुयात मातीपासून बनवलेले सोलापुरी आकाश कंदील!
सोलापूरच्या नीलम नगर परिसरात मातीपासून पर्यावरण पूरक आकाश कंदील तयार केले जात आहेत. या कंदिलांसाठी तीन ते चार प्रकारची माती वापरण्यात आली आहे. ही माती आंध्र प्रदेश, कर्नाटक, पंढरपूर येथून मागवली जाते. आकाश कंदील मशीनवर बनवले जात असून त्याची कटिंग हातावर केली जाते. दिवसाकाठी पंधरा ते वीस आकाश कंदील तयार केले जातात. हे कंदील पर्यावरण पूरक असल्याचं सांगितले जात आहे.
या आकाश कंदीलात एलईडी लाइट चा उपयोग करण्यात आला आहे. एका आकाश कंदीलाची किंमत 250 ते 300 रुपयापर्यंत आहे. शिवाय ग्राहक दिवाळी नंतर घरात शो पिस म्हणुन देखील हे कंदील वापरू शकतात. कोरोना महामारी आणि वाढत्या महागाईचा या व्यवसायावर परिणाम झाला असून ग्राहकांचा खरेदीसाठी अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे व्यापारी सांगतायत.