दिवाळीच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाला केरसुणीची पूजा करण्याची प्रथा आहे. ग्रामीण भागात आजही ही प्रथा पाळली जाते. लॉकडाऊनच्या काळात या केरसुणी तयार करुन विकणाऱ्यांना मोठा फटका बसला होता. निर्बंधांमुळे या लोकांना गावोगावी फिरुन व्यवसाय करता आला नव्हता. त्यामुळे गेल्यावर्षीची दिवाळी अंधारात गेली होती. यंदा दिवाळीमध्ये निर्बंध शिथिल झाल्याने सर्वत्र खरेदीसाठी गर्दी आहे. पूजनासाठी केरसुणीला देखील मागणी आहे.
केरसुणीला लक्ष्मी मानून पूजा करण्याची प्रथा आहे. पण ही लक्ष्मी अर्थात केरसुणीचे दर यंदा 10 ते 15 टक्क्यांनी वाढले आहेत. कोरोना काळात या व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर संक्रात आली होती. आता हा व्यवसाय पूर्वपदावर आला असला तरी कारागीर मात्र अडचणीत सापडले आहेत. केरसुणी तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल आणि इतर साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे केरसुणीचे दर वाढले असले तरी उत्पादन खर्च वाढल्यामुळे केरसुणी बनवणाऱ्या कारागिरांची दिवाळी मात्र गोड होऊ शकलेली नाही.