महिलांसाठी खास राजकीय साक्षरता अभियान
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा असे म्हटले जाते. पण त्यासाठी स्थानिक पातळीवर महिला नेतृत्व विकसित केले जात नाही. पण आता यासाठी राज्यात गेल्या ३ वर्षांपासून एक प्रयोग केला जातोय. ग्रामीण भागातील महिलांना ‘सक्षम पंचायत साक्षर’ करण्यासाठी हा प्रयोग आहे. यासंदर्भात अकोला पंचायत समितीच्या सदस्य मंगला शिरसाठ आणि सावित्री अकादमीचे राज्य निमंत्रक दत्ता गुरव यांच्याकडून ही प्रक्रिया समजून घेतली आहे पत्रकार साधना तिप्पन्नाकजे यांनी...;
गावात कितीही चांगलं काम केलं, तरी कित्येक महिला निवडणुकीचे डावपेच लढण्यात अपयशी ठरतात. महिलांना आरक्षण मिळालं, पण त्या संधीचा उपयोग करण्यासाठीही त्यांना संघर्ष करावाच लागतो. महिलांच्या संख्यात्मक वाढीसोबत ती गुणात्मकही असली पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येणारी प्रत्येक महिला लोकप्रतिनिधी 'सक्षम पंचायत साक्षर' असणं खूपचं आवश्यक आहे. आपल्याकडे निवडणुका जाहीर झाल्या की उमेदवाराचा शोध सुरू होतो. यामुळं योग्य लोकप्रतिनिधी निवडला जात नाही. गेल्या 27 वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन महिला राजसत्ता आंदोलन महाराष्ट्रात नागरिकांच्या राजकीय सक्षमीकरणाकरता आगळावेगळा कार्यक्रम राबवत आहे. 14 हजारच्या आसपास गावांमध्ये आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यातल्या 100 गावांमध्ये निवडणुकीची तयारी गेल्या तीन वर्षांपासूनच सुरू झाली आहे.
या उपक्रमांतर्गत तळागाळातल्या महिलांमध्ये त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची जाणीव करून देणं, त्यांच्यातील नेतृत्वशील महिला शोधणं, त्यांच्यात राजकीय जाणीवा विकसित करणं, त्यांच्याकरता प्रशिक्षण कार्यक्रम आखणे, स्थानिक सत्ताकारण व डावपेचांचा अभ्यास करून निवडणूक रणनीती आखणं आणि महिलांकरता सपोर्ट ग्रुप तयार करणं ह्या गोष्टी प्रामुख्यानं करण्यात आल्या.
यासंदर्भात अकोला पंचायत समितीच्या सदस्य मंगला शिरसाठ आणि सावित्री अकादमीचे राज्य निमंत्रक दत्ता गुरव यांच्याकडून ही प्रक्रिया समजून घेतली आहे पत्रकार साधना तिप्पन्नाकजे यांनी...