युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या रेंज रोव्हर गाडीला रस्त्यांवरील खड्ड्यांचा फटका बसला आणि गाडीचा टायर फुटला. सर्व वर्तमानपत्रे आणि टीव्ही वाहिन्यांवर आदित्य ठाकरे यांच्या गाडीचा टायर फुटल्याच्या बातम्या आल्या. वास्तविकत: ही गाडी आदित्य ठाकर यांची नाहीय. या गाडीचा मालक वेगळाच असून आदित्य ठाकरे ही गाडी वापरत असल्याचं सांगीतलं जात आहेत.
ज्या रेंज रोव्हर गाडीचा टायर फुटला ती MH 01 CD 0005 ही गाडी बांधकाम तसंच इतर अनेक क्षेत्रात कार्यरत असलेले उद्योजक दिलीप रमनलाल ठक्कर यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. मुंबई सेंट्रल आरटीओ मध्ये या गाडीची नोंदणी झालेली आहे.
खराब रस्ते दाखवा आणि १००० रूपये मिळवा अशी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली होती, या योजनेअंतर्गत आदित्य ठाकरे यांना १००० रूपये मिळायला हवेत अशा बातम्या काही ठिकाणी आल्या होत्या. मात्र, ही गाडीच आदित्य यांची नसल्याने हे १००० रुपये दिलीप ठक्कर या उद्योजकालाच मिळतील की काय असं गंमतीनं म्हटलं जातंय.