बीडमधील ऑनर किलींग या घटनेने सध्या सर्वत्र हाहाकार माजला आहे. सुमित आणि भाग्यश्रीने घरच्यांच्या विरोधात जावून प्रेमविवाह केला परंतु मुलीच्या सख्ख्या भावानेच फक्त इज्जतीचा विचार करुन तिच्या नवऱ्याचा खून केला. याआधी देखील त्या मुलीच्या भावाने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यासंदर्भात पोलिसात तक्रार करुनही पोलीसांनीही या गोष्टीची दखल घेतली नाही. या घटनेने इतकेच वाटते की खरचं फक्त समाजाच्या भितीने वा मान-अपमानावरुन माणसातील माणूसकीसुद्धा नष्ट झाली आहे का…?
एक बहीण आपल्या भावाला तिच्या रक्षणाची जबाबदारी सोपवत असते परंतू इथे एका भावाला तर बहीणीच्या आनंदापेक्षा समाजातील मान-अपमान जास्त महत्त्वाचा वाटतोय… मुलीने प्रेमविवाह केला म्हणून हा राग व्यक्त झाला हे खर परंतू तिची निवड कितपत योग्य नाही किंवा आहे या गोष्टीचा विचार करणे गरजेचे नव्हते का…? तिने चांगल्या उच्च शिक्षित मुलाची निवड केली होती पुढे जावून तिचे भविष्य चांगलेच असते हा विचार तिने नक्कीच केला होता. परंतू समाजाला त्या दोघांमधील प्रेम, त्यांच्यातील समंजसपणा एकमेकांशी लग्न करताना त्यांनी तितकाच केलेला भविष्याचा विचार या सगळ्यापेक्षा त्यांनी समाजाच्या कुटुंबाच्या विरोधात जावून लग्न केले, ही गोष्ट अधिक महत्त्वाची वाटते ही खरचं खूपचं लाजिरवाणी गोष्ट आहे.
आपण म्हणतो माणूस बदलतोय वेळेनुसार… म्हणजे आजच्या नव्या पिढीच्या भाषेत अपग्रेड होतोय पण अशा घटना जेव्हा समोर येतात तेव्हा वाटते खरचं माणूस अपग्रेड होतोय…? नुसते नव्या गोष्टी शिकून आत्मसात करुन उपयोग नाही मुळातच आपल्या जुन्या विचारांमध्ये बदल होणे आवश्यक आहे. सध्याची पिढी खरतरं खूप समंजस आहे त्यांना आपल्या भविष्याचा विचार करण्याची समज आहे. मुलगी ही एखाद्या मुलावर लग्न करण्याइतपत विचार तेव्हाच करते जेव्हा तिला संपूर्ण खात्री असते की तो तिला सांभाळण्याच्या लायक आहे. त्याच्यामध्ये तितकी क्षमता आहे की तो तिचा सांभाळ करु शकतो, मग फक्त ती तिच्या मर्जीने लग्न करतेय किंवा प्रेमविवाह आहे म्हणून समाजाने त्यांना नाकारणे कितपत योग्य आहे? अशी काय मोठी चूक केलेली त्या दांपत्याने? की हे प्रेमचं त्यांच्या जीवावर उठतं…?
असे नेहमी म्हणतात प्रेम हे नैसर्गिक आहे…हि एक अशी भावना आहे की ती कधी कशी जाणवेल सांगता येत नाही प्रेम करताना ते दोघे एकमेकांसोबत सुखी आहेत तर फक्त समाज काय म्हणेल यामुळे कोणी प्रेम करू नये का…? कधी हा समाज अशा विचारांचे कुंपण तोडून विचार करणार…? कधी ह्या जगातील कुटुंब समाज काय म्हणेल यापेक्षा योग्य काय आहे याचा विचार करेल… ? या सर्व प्रकरणावरुन अखेर एकचं प्रश्न उद्भवतोय..प्रेमाची भाषा कधी समजणार या समाजाला ?