अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात उद्घाटक वैशाली येडे यांनी केलेले uncut भाषण
नमस्कार मंडळी,
अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते, हे पुन्हा सिद्ध झालं. मराठीच्या इतक्या मोठ्या मंगल सोहळ्याले कुंकवाचा टिळा लावन्यासाठी माह्यासारखी विधवाच कामी आली, हे माहं भाग्य समजते.
आता पुर्नजन्म मी मानत नाही, मानला असता तर माह्या नवर्यावानी मी पण आत्महत्या केली असती. त्यानं आत्महत्या केली, पुढचा जलम उद्योगपतीचा घेईन, अंबानी अन् अदानीच्या घरी जलमीन अन् शेतकर्यायचा माल जास्त भाव देवून विकत घेईन म्हनून तो मेला. शेतकरी मरून मातीत गेला तरीबी अंबानी, अदानी होत नाही, हे माह्या नवर्याले समजलं नाही.
माहा याच जलमावर विश्वास हाय. म्हून मी याच जन्मी लढीन अन् वायद्याची शेती फायद्यात आनीन म्हनून लढत हावो... लडत नाही, लढत हाव!
मी बारावी शिकली हाय. पन बहिनाबाईची लेक हाय. म्हनून ज्योतिषाले हात नाही दाखवत, जो कोनी अंगावर हात टाकाले आला त्याले हात दाखवतो... हे शिकली मी आमच्या एकल महिला संघटनेत. हरीभाऊच्याच अॅग्रो थिएटरमध्ये. लेखन, त्याचा बाजार, साहित्य वाचलेलं नाही; पन मानसं वाचले हायत. मानसं पुस्तकं वाचून नाही समजत, त्याच्यासाटी मानसायतच जावं लागते. तरीही साहित्यानं जगन्याचं बळ येते, हे खरं हाय. म्हनूनच ‘तेरवं’ या नाटकानं हे बळ दिलं. वांझोटे शब्द नाही, काम करतेत आमचे हरीष इथापे अन् श्याम पेठकर. म्हनून त्यायच्या शब्दात ताकत हाय. श्यामभाऊनं हे नाटक लिहिलं. हरीभाऊनं दिग्दर्शन केलं. नाटकात काम करन्याचं प्रशिक्षन दिलं आम्हाला. त्यातून उभं राहन्याचं बळ आलं.
मर्द शेतकर्यायच्या आत्महत्यायनं हादरले सारे. त्याच्या करुण कहान्यानं हेलावले. मात्र, आम्हा बायकाच्या जगन्याचा मर्दानी संघर्ष नाही दिसला... बाई सोयीले असते. बोलनारी बाई नाही चालत, डोलनारी अन् डोलवनारी पाह्यजे असते. म्हनून दिल्लीवाली विधवा नाही चालली. मले बोलावलं, पन बोलनार त मीपन हायच ना. एक सांगून ठेवतो, मी विधवा नाही. आम्ही विधवा नाही. एकल महिला आहोत. श्यामभाऊनं नाटकात वाक्य लिहिलं हाय, ‘समाजच विधवा झाला हाय...’ तेच खरं हाय.
एकली ग बाई असी
तुपासंग पोयी जसी
एकलीचा भीतीनं
जीव झाला गोया
एकल्याव रांडेवर
सार्या गावाचा डोया
एकटी बाई सार्यायले संधीच वाटते. आजकालचे लक्षूमन एकली पाहून वयनीले लक्ष्मनरेषा काढते पण ते तिले कोनी वाचवाले येऊ नये त्याच्यापासून याच्यासाटी. तिनं बाह्यरं जाचं नाही अन् बाहेरच्यानं अंदर याचं नाही अन् हा करन तिचा घास...
बाई सगळं सोडून येते कायले नवर्याच्या मांग त्याच्या घरांत. सारंच बदलते ना तिचं... कुळाचं नाव, कुळाचं दैवत, माय-बाप, गाव, घर अन् बापाच्या ठिकानी नवर्याचं नाव येते... नवरा त तिचं तिच्या माय-बापानं ठिवलेलं नावबी बदलून टाकते. तिचं आपलं काहीच राहात नाही. अर्धी जिंदगी झाल्यावर अचानक सारं असं बदलून जाते...
एखांद्या मर्दाचं असं नाव बदलून टाकलं अन् सारंच बदलून टाकलं अन् म्हनलं त्याले का आता जगून दाखव त जमनं का त्याले हे?
मी वैशाली ---- होती... अठारा वर्षाची होत पर्यंत. मी वैशाली सुधाकर येडे झाली. सुधाकर येडेचा समजा सुधाकर वैशाली ---- झाला असता त?
थोडा धक्का नाही सह्यन झाला अन् खुदखुसी करून घेतली त्यानं!
एकदा नवरा गेला का सार्या गावाले थे बाई संधी वाटते. धन वाटते... जुन्या कायापासून गोधन अन् स्त्रीपन धनच वाटत आली हाय.
आमच्या वाट्याले आलेलं हे पांढरं कपाय असं निसर्गाच्या नियमानं आलेलं नाही. सटवाईनं नाही लेहलं हे विधवापन आमच्या कपायावर. जगरहाटीनं लादलं हाय हे. व्यवस्थेनं आपल्या नवर्यायचा बळी घेतला हाय अन् तो त मेलाच पन आमच्या जित्तं असन्याचाही कोनी विचारही नाही करत. म्हणून मंग-
आम्ही तेरवं मांडलं
बाई आम्ही तेरवं मांडलं
आसवायचं दानं आम्ही
खलबत्यानं कांडलंऽऽ
महादेवानं केली शेती
पार्वतीच त्याची सोबती
जमिनीच्या वाह्यतीत बाई
हलाहलच सांडलंऽऽऽ
गडी आमचा महादेव
झाला रंक बाई रावाचा
मामला घामाच्या भावाचा
शिवार पायानं लवंडलंऽऽ
मला बोलावलं, बोलूपन दिलं, आयकूनही घेतलं... ते मनावर घ्या. तुम्ही आमच्या दु:खावर कादंबर्या लिहिता. कथा लिहिता. पुरस्कार भेटते त्याला. सिनेमे काढता... लेखक अन् आम्ही कास्तकार सारखेच, दोघायलेबी भाव नाही भेटत.
या संमेलनात अशी चर्चा व्हावं की अभावात जगनार्यायले भाव भेटावं...
नमस्कार, रामराम, जयभीम, सलाम, हॅव अ गुड डे