मूळच्या भारतीय असणाऱ्या उशीर पंडित-दुरांत यांनी न्यूयॉक सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची शपथ घेतली. उशीर या अहमदाबादच्या रहिवासी असून वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी कुटुंबासहित अमेरिकेत स्थलांतर केलं होते.
एकेकाळी इंग्रजी बोलता न येणाऱ्या उशीर यांनी वयाच्या 57 व्या वर्षी न्यायधीशपदी मजल मारल्याने अनेकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
न्यूयॉर्क लॉ स्कूलमधून उशीर यांनी कायद्याची पदवी मिळवली तेव्हा त्यांच्यासोबतचे बहुसंख्य विद्यार्थी खाजगी कायदे संस्थांमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी शोधत होते. पण उशीर यांनी मात्र क्वीन्स जिल्ह्यात सरकारी वकील होणं पसंत केलं. १५ वर्षं 'डिस्ट्रीक्ट अॅटॉर्नी' म्हणून काम केल्यानंतर २०१५मध्ये त्यांची क्वीन्स जिल्ह्याच्या सत्र न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर चारच वर्षांत त्यांची न्यूयॉर्क राज्य सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. आता पुढची चौदा वर्षं न्यूयॉर्क सर्वोच्च न्यायालयात त्यांना न्यायदान करता येणार आहे. भगवदगीतेवर हात ठेवून न्यायाधीशपदाची शपथ घेणाऱ्या त्या पहिल्या अमेरिकी न्यायाधीश ठरल्या आहेत.