अजूनही आरोपी मोकाटच...

Update: 2018-12-21 12:38 GMT

बीडमध्ये झालेल्या भयंकर ऑनर किलींग प्रकरणी पोलिसांचे पाच पथक जारी करुनही अद्याप मयत सुमितचे आरोपी मोकाटच आहेत. हत्या होऊन दोन दिवस उलटले तरीही मारेकरी अजूनही फरार आहे. भाग्यश्रीने आरोपींची नावं सांगितली असूनही आणि हत्येपूर्वी पोलिस स्टेशनला तक्रार करायला गेली असतानाही पोलिसांनी तिची तक्रार घेतली नाही. तिने या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचा उल्लेख केला आहे. आरोपी बालाजी लांडगे याने याच्या आधीही सुमितला मारण्याचा प्रयत्न केला होता.परंतु राजकीय दबावामुळे आमची तक्रार नोंदवून घेतली नाही असं भाग्यश्रीने म्हटलं आहे.

सुमित हा ऑनर किलींगचा नाही तर पोलिसी निगरगट्टीपणाचाही बळी आहे. त्यामुळे या हत्येनंतर पोलिस प्रशासनावरही अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे परंतू गुन्ह्यात वापरलेली गाडी फक्त ताब्यात घेतली आहे. मात्र मारेकरी माहित असून देखील त्याला अटक करण्यात आलेली नाही. सुमितच्या मित्रांनी याबाबत आरोपींना अटक न केल्यास पोलिस-प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी बीडची ऑनर किलिंगची घटना अतिशय गंभीर आहे. बीडमध्येच नव्हे तर राज्यातच कायदा व सुव्यवस्था कोठे आहे असा प्रश्न आहे. बीडमध्ये तर पोलीसच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसारखे काम करू लागले असून गुन्हेगारांच्या मुसक्या बांधण्याऐवजी पत्रकारांना वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. असं ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत म्हटलं आहे. यावरुन राज्यातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Similar News