इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर शिखर धवन अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. पीटीआयने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात शिखर धवनने शतकी खेळी केली होती. मात्र या सामन्यात पॅट कमिन्सचा उसळता चेंडू त्याच्या अंगठ्याला लागला होता. यानंतर शिखर धवन त्या सामन्यात क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरलाच नव्हता.
शिखरची तपासणी केल्यानंतर, १०-१२ दिवसात तो बरा होईल असं संघाचे फिजीओ आणि डॉक्टरांच्या पथकाने सांगितलं होतं. यासाठी पर्यायी खेळाडू म्हणून ऋषभ पंतला इंग्लंडला रवाना करण्यात आलं होतं. मात्र शिखर धवनच्या दुखापतीमध्ये सुधार होणार नसल्याचं समजताच त्याचं संघाबाहेर जाणं निश्चीत करण्यात आलं आहे. शिखर धवनच्या जागी ऋषभ पंतला संघात जागा देण्यात आली आहे.