तुझी आई काय काम करते ? या प्रश्नाच उत्तर “काही नाही ती घरीच असते” असे आल कि आपल्या लक्षात येते या वाक्यातली नकारात्मकता. बाईच काम जे घरासाठी केलं जात त्याची जबाबदारी सर्वांची असुनही बाई ती जबाबदारी एकटी उचलते तरी “ती काहीच काम करत नाही” अशीच समाजाची म्हणं असते. सकाळ ते रात्री उशिरा पर्यंत कोणाला काय हव नको हे ती बघते तरी “ती काहीच करत नसते.” आपल्याकडे कामाची व्याख्या ही पैशाच्या रुपात केली जाते, त्यामुळे जो जितके पैसे कमवतो तो तितके काम करतो असे मानले जाते त्यामुळे घरात स्त्रिया जी कामे करतात त्याला कामाच्या व्याखेत स्थान नाही त्यामुळे स्त्रियांना जोपर्यंत कामाचा मोबदला मिळत नाही तो पर्यंत त्यांच्या कामाला कामाचा दर्जा मिळणार नाही. अनेकदा या कामाला भावनांचा आधार देत त्या कामांचे मूल्य नाकारले जाते. याबाबत अनेकदा विषय उपस्थित केल्यावरही घरातल्या कामांचे मूल्य केले तर त्यातील भावनांचा अपमान केल्या सारखं होतं असा सूर लावला जातो, तसेच या कामाचे मूल्यांकन कसे करायचे? याची प्रक्रिया कशी ठरवावी असे प्रश्न उपस्थित करून विषयाला बगल दिली जाते. कारण “ती” घरीच असते.