केरळच्या शबरीमाला मंदिराचा वाद आज पुन्हा चिघळल्याचे दिसले. आज पुन्हा काही महिलांनी मंदिरातील प्रवेशावरुन जोरदार विरोध प्रदर्शन सुरू झाले. २३ डिसेंबर रोजी सकाळीच ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या ११ महिला दर्शनासाठी आल्या आणि शबरीमला मंदिराच्या परीसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
त्यानंतर या महिलांनी मंदिर प्रवेशासाठी मदुराईमधून पायी यात्रा सुरू केली होती. जंगल मार्गाद्वारे आल्यानंतर मंदिरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर विरोध करणाऱ्या भाविकांनी मज्जाव केला. त्यामुळे मंदिरातील परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीसांची फौज तैनात केली गेली. यावेळी विरोध करणाऱ्या काहींना पोलीसांनी ताब्यात घेतले.
दर्शनासाठी आलेल्या महिलांनी मंदिरात प्रवेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही. भगवान अयप्पा यांचे दर्शन होईपर्यंत आमचा निषेध सुरूच ठेवू. सुरक्षेच्या कारणांमुळे पोलिसांनी आम्हाला परत जाण्यास सांगितलंय, पण आम्ही जाणार नाही, असे ठामपणे सांगितले आहे. या महिला चेन्नईतील ‘मानिथि’ संघटनेच्या सदस्य आहेत.