शबाना आझमी यांचा अपघात आणि ट्रोलर्स

Update: 2020-01-20 12:53 GMT

पाच राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या, संवेदनशील अभिनेत्री आणि माजी राज्यसभा खासदार शबाना आझमी यांचा गेल्या आठवड्यात अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्य़ा शबाना आझमी य़ांच्यावर आता मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना आठवड्यानंतर सुट्टी दिली जाईल असं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी म्हंटलय. आझमी यांचा अपघात झाल्यानंतर सोशल माध्यमांवर बऱ्याच प्रतिक्रीया उमटत आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शबाना आझमींना लवकर बर होण्यासाठी शुभेच्छा दिल्यात. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी ह़ॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली.

दुसरीकडे मात्र समाज माध्यमांमध्ये आझमी यांच्यावर खूप टोकाच्या प्रतिक्रीया उमटत आहेत. आझमी यांच्याबद्दल काही नेटकऱ्यांनी खूपच टोकाच्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. शबाना आझमी यांनी अभिनेत्री म्हणून आपल्या कामाचा ठसा तर उमटवलाच आहे. मात्र समाजसेवेतही त्या अग्रेसर असतात. देशातील संवेदनशील विषयावर कुणाचीही पर्वा न करता आझमी आपलं मतप्रदर्शन करत आल्या आहेत. मोदी सरकारच्या अनेक चुकीच्या ध्येयधोरणांवर त्यांनी टीका केली आहे. मात्र त्याचबरोबर मुस्लीम समाजात चाललेल्या चुकीच्या प्रथांवरही त्यांनी टीका केली आहे.

तुम्ही जर ट्विटर, फेसबुकवरच्या आझमी यांच्याबद्दलच्या प्रतिक्रीया बघितल्या तर आझमी यांची हेटाळणी पाकिस्तान धार्जिण्या म्हणून केली जातेय. काही जण आझमी यांनी पाकिस्तानमध्ये जावून उपचार घ्यावेत, तर त्यांचा ड्रायव्हर हिंदू असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय, या शब्दात आझमी यांच्यावर टीका केली आहे. यामध्ये तरुण, तरुणींचा समावेश जास्त आहे.

शबाना आझमी या प्रसिध्द शायर, गीतकार दिवंगत कैफी आझमी यांच्य़ा कन्या आहेत. कैफी आझमी हे देशातील मोठे उर्दू शायर आणि डावे नेते होते. आझमी घराण्याला कट्टर धर्मनिरपेक्षतेचा मोठा वारसा आहे. कर चले हम फिदा, जानो-तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो असं देशभक्तीचं अजरामर गाण लिहिणाऱ्या कैफी आझमींच्या मुलीवर या रितीनं का टिका, ट्रोल व्हावं हा प्रश्न निर्माण झालाय.

— Saffron philosopher (@omprakashkedia) January 18, 2020

अलिकडे पाकिस्तानी, तुकडे तुकडे गँग, अर्बन नक्षलवादी अशी नावं सर्रास ठेवण्याची फॅशन झालीये. भारतीय संस्कृतीत जखमी किंवा मरण पावलेल्या माणसाबद्दल अपशब्द काढू नये असा संकेत आहे. तो आजपर्यंत पाळला जात होता. मात्र सध्या देशात कुणाचीही पार्श्वभूमी न समजून घेता बिनधास्त टीका केली जाते. असं का होतं, या मागची मानसिकता काय आहे. आजचा तरुण का बिथरला आहे असे प्रश्न पडतात.

डॉ. समीर दलवाई

खूप संताप, नकारात्मक भावना घेवून आजची पिढी जगत आहे. त्यामुळे ते या बिनधास्तपणे, अगदी खालच्या थराला जाऊन अशाप्रकारे व्यक्त होत आहेत. दुसरं म्हणजे डिजीटल मीडियामुळे कुणालाही त्याचं म्हणणं प्रखरपणे मांडता येत आणि तेही विनाखर्च.

आज सर्वत्र अंत्यत नकारात्मक आणि टोकाचं मत मांडणाऱ्य़ा, बोलणाऱ्याला जास्त प्रसिध्दी मिळते. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या सेलिब्रिटी, नेत्यांबद्दल लोक काहीही बोलून मोकळे होतात. आता शबाना आझमी यांची पार्श्वभूमी काय आहे हे त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी ते जाणून घ्यावं अस कुणालाही वाटत नाही. शेवटी टीका करणाऱ्यांचा आझमी यांच्याशी कुठलाही वैयक्तिक संबध नसतो. त्यामुळे टोकाला जावून टीका करण्याचं धाडस या व्यक्तींचं होतं. कदाचित टीका करणारे पुढे शबाना आझमी यांना प्रत्यक्ष भेटले तर ते काहीच बोलणार नाहीत. यालाच फेसलेस मॉब म्हणतात. सध्या या मॉबची संख्या वाढत चालली आहे, असं डॉक्टर समीर दलवाई म्हणतात.

डॉ. उत्कर्ष शिंदे, गायक, अभिनेते

शबाना आझमी यांना व्यावसायिक चित्रपटात चांगलं यश कमावलं मात्र तरीही त्यांनी समांतर चित्रपटाला जास्त प्राधान्य दिलं. या माध्यमातून भारतातल्या त्यावेळच्या समस्या, भीषण सत्य त्यांनी या जगापुढं आणलं. यातूनच शबाना आझमी यांचा मोठेपणा दिसून येतो. शबाना आझमींनी मोदी सरकारच्या ध्येयधोरणावर टीका केली. त्यांनी मोदींवर वैयक्तिक टीका केली नव्हती. त्यामुळे वेगळा विचार मांडला की ट्रोल करा, ही वृत्ती वाढली आहे. मात्र ही विषवृत्ती पसरवली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

व्यवसायाने डॉक्टर असलेल्या उत्कर्ष शिंदे यांनी शबाना आझमी यांनी ‘छुने से बिमारी नही, प्यार फैलता है. असा संदेश देत एचआयव्ही पेशंटसाठी मोठी मोहीम हाती घेतली होती. त्याच शबाना आझमी यांच्याबद्दल द्वेषाचा वायरस पसरवला जातोय, याचं भान काही तरुणांना नाही याची खंत व्यक्त केली. सकाळी उठल्यानंतर पहिले मोबाईल पाहण्याची सवय असलेली ही तरुण पिढी फॉलो आणि फॉरवर्डमध्ये गुरफटून गेलीये. त्यामुळे नकारात्मक पोस्टचा भरणा असलेला मजकूर तपासून घेण्याची वेळ या तरुणांकडे नाही.

धनराज वंजारी, निवृत्त पोलिस अधिकारी

पोलिस अधिकारी म्हणून निवृत्त झालेले धनराज वंजारी यांनी शबाना आझमी यांना ट्रोल करण्यामागे हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण कारणीभूत असल्याचं सांगितलंय. देशाच्या फाळणीपासून हा द्वेष सुरु झालाय. पाकिस्तान तुमचा शत्रू, मुस्लिम हा धर्मशत्रू ही भावना निर्माण केली गेली आहे. या ध्रुवीकरणाची फळं आजची तरुण पिढी भोगत आहे. वैचारीक शून्यता आजच्या तरुणांमध्ये निर्माण केली गेली आहे.ते अंधभक्त झालेत. त्यामुळे बौध्दिक क्षमता गमावलेले तरुण याप्रकारे कुणालाही ट्रोल करतात.

या तरुणांपैकी कुणाचा भाऊ, बहिण जखमी झाली आणि त्यांना याप्रकारे ट्रोल

केलं तर त्यांना कसं वाटेल याचा त्यांनी विचार करायला हवा. बौध्दिक क्षमता नष्ट झाल्यामुळे या तरुणांमधील संवेदनशिलता मेली आहे, असं वंजारी यांचं विश्लेषण आहे.

हेमंत देसाई, जेष्ठ पत्रकार

शबाना आझमी यांच्या भूमिकेमुळे त्यांना ट्रोल केल्या जात असल्याचं राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई म्हणतात. शबाना आझमी यांनी सातत्यानं पुरोगामी भूमिका घेतल्या. प्रखर हिंदुत्ववादाच्या विरोधात त्या लढल्या. त्यांचे आई, वडील कम्युनिस्ट होते आणि हिंदुत्ववाद्यांना डाव्यांचा तिरस्कार आहे. त्यामुळे शबाना आझमी या काही वर्गाला खटकतात. त्यामुळे या ट्रोलिंगमागे हिंदूत्ववादी आर्मी आहे असं हेमंत देसाई म्हणतात.

 

शबाना आझमी

शबाना प्रसिध्द कवी, लेखक कैफी आझमी व रंगभूमी कलाकार शौकत आझमी यांची कन्या आहे. पुण्याच्या एफटीआयमधून त्यांनी चित्रपट निर्मितीचं शिक्षण घेतलं. १९७४ पासून शबाना आझमी यांनी अभिनयाची कारकीर्द सुरु केली. व्यावसायिक सिनेमांसोबत, शबाना आझमींनी अनेक समांतर सिनेमात काम केलं. सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून आझमी यांनी ५ वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेत. तर उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना अनेक आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. पाच फिल्मफेअर पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. १९८८ मध्ये शबाना आझमी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आझमी यांनी १२० हिंदी आणि बंगाली चित्रपटात काम केलं. समांतर सिनेमाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणूण त्यांना जगात ओळखलं जात. चित्रपटातील योगदानासाठी त्यांना राज्यसभेचं सभासदत्व दिलं गेल होतं. सध्या त्या संयुक्त राष्ट्राच्या गूडविल अम्बेसडर आहेत.

वडील सामाजिक चळवळीत भाग घेत असल्यामुळे त्यांच्या घरात कायम कार्यकर्त्यांची वर्दळ राहायची. सर्वांना कॉमन टॉयलेट, बाथरुम वापरावं लागत असे. कैफी आझमींना लिखाणातून चांगली कमाई होत असे. मात्र कम्युनिस्ट पक्षाला सर्व पैसै द्यावे लागायचे. स्वत:च्या घरखर्चासाठी केवळ ४० रुपये ठेवावे लागत. त्यातून घर खर्च भागत नसे. त्यामुळे आई शौकत समांतर रंगभूमीवर काम करायची.त्यातून घर चालायचं असं शबाना आझमी यांनी लिहिलंय.

समांतर सिनेमाच्या नायिका

आझमी यांना ’ फासला’ या चित्रपटात पहिला ब्रेक मिळाला. मात्र त्यांनी भूमिका केलेला श्याम बेनेगल यांचा अंकुर चित्रपट आधी रिलीज झाला. अंकुरमध्ये शबाना आझमी यांनी लक्ष्मी या बंडखोर तरुणीची भूमिका केली. या भूमिकेसाठी बेनेगल यांनी अनेक आघाडीच्या अभिनेत्रींना विचारणा केली. मात्र सर्वांनी नकार दिल्यानंतर, शबाना आझमी यांना भूमिका मिळाली. या व्यक्तीरेखेनं आझमींना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. सत्यजित रे यांनी शबाना आझमींच्य़ा अभिनयाचं भरभरुन कौतूक केलं. पुढे त्यांनी आपल्या दोन चित्रपटात शबाना आझमी यांना भूमिका दिली.

शबाना आझमींनी १९८३ ते १९८५ या तीन वर्षात अर्थ, खंडहर, पार यासाठी सलग तिन राष्ट्रीय पुरस्कार जिंकले. १९९९ मध्ये गॉडमदरमधील त्यांच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मंडी या चित्रपटात आझमी यांनी वेश्येची भूमिका निभावली. भूमिकेसाठी आझमी यांनी वजन वाढवलं. मासूम या चित्रपटात आझमींनी एका संवेदनशील आईची भूमिका केली. १९९६ मध्ये दीपा मेहता य़ांच्या फायर या चित्रपटात एकाकी पडलेल्या राधा या महिलेची भूमिका केली. लेस्बियन संबंधांवर आधारलेल्या या चित्रपटाला देशात खूप विरोध झालाय. मात्र या भूमिकेसाठी आझमींना सिल्वर ह्युगो पुरस्कार मिळाला. शिकागो फिल्म फेस्टीवल मध्येही शबाना आझमींचा गौरव केला गेला. दीपा मेहता यांच्या वॉटर चित्रपटासाठी आझमींनी आपल्या डोक्यावरचे केस कापले होते.

श्याम बेनेगल यांच्या निशांत, जुनून, अंतंरनाद, सत्यजित रे याच्या शंतरज के खिलाडी, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यो आता है, अर्थ, गॉडमदर, स्पर्श या चित्रपटात शबना आझमी यांनी ताकदीच्या भूमिका साकारल्या.

व्यावसायिक चित्रपटातही शबाना आझमी यांनी यश कमावलं. अवतार,एकही रास्ता, लहू के दो रंग, अमर-अकबर-अँथोनी. परवरीश यासारखे चित्रपट सुपरहीट ठरले.

Similar News