मुंबई – राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी डान्सबार बंदीचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्यावर एकाबाजूने अभिनंदनाचा वर्षाव होत असतांना दुसरीकडून टीकेचा भडीमारही सुरू होता. याच काळात एक अशी घटना घडली ज्यामुळे आर.आर.पाटील यांना स्वतःच्या सुरक्षेसाठी महिला पोलिसांना तैनात करावं लागलं होतं.
२००५ मध्ये गृहमंत्री म्हणून आर.आर.पाटील यांनी डान्सबार बंदी लागू करून घेण्यासाठी महत्त्वाची भुमिका बजावली होती. डान्सबार बंदीमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सुमारे २ लाख लोकांना रोजगार मिळत होता, तो अचानक बंद झाला होता. त्यामुळे या सर्वांचा रोष हा गृहमंत्री पाटील यांच्यावरच होता. असेच एका दिवशी डान्सबार गर्लचं एक शिष्टमंडळ आर.आर.पाटील यांना भेटायला आल्या होत्या, त्या शिष्टमंडळाचं म्हणणं ऐकून घेत असतांना काही बारगर्ल्सनी आबांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर आबा कमालीचे संतापले आणि त्यांनी त्या क्षणापासूनच आपल्या सुरक्षेमध्ये महिला पोलिसांचाही समावेश करण्याचा निर्णय घेतला होता.