पालघर हत्याकांड : कमालीचा अंधविश्वास आणि व्यवस्थेवरच्या अविश्वासातून होताहेत सामुहिक हल्ले

Update: 2020-04-22 05:41 GMT

संपूर्ण देशाचं लक्ष आज पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्येच्या घटनेकडे आहे. गुरुवारी, १६ एप्रिल रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडलीय. या घटनेवर भारतीय जनता पार्टी आणि भारतीय मिडियाने मोठं रान उठवल्यामुळे ती प्रकाशझोतात आली. पण दोनच दिवस आधी सदर परिसरातील सारणी गावात डाॅ. विश्वास वळवी आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद काळे यांच्यावर हल्ला झाला होता.

साधू हत्याकांडाच्या दुसऱ्याच दिवशी १७ एप्रिलला आणखी एक हल्ला झाल्याचीही माहिती पुढे आलीय. पण पीडीत व्यक्ति स्थलांतरित मजूर असल्याने त्या घटनेला कोणी फारसं महत्वं दिलेलं नसल्याचं सांगितलं जातंय. घोलवड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. सलग तीन दिवस घडलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या घटनांमुळे गडचिंचलेच्या घटनेला धार्मिक रंग देण्याच्या प्रयत्नातला पोकळपणाही उघड झाला आहे.

आपल्या भागात चोरांच्या, दरोडेखोरांच्या टोळ्या आल्यायंत, ते माणसं पळवतात, मुलं पळवतात, किडन्या काढून विकतात या आणि इतर अनेक अफवांना डहाणू परिसरात गेल्या महिनाभरापासून ऊत आलाय. मॅक्समहाराष्ट्र ने डहाणू, सफाळे, सावटा, कामा, दाभोडी, बोईसर भागातील वेगवेगळ्या लोकांकडून अफवा पसरल्या असल्याबाबत खात्री केलीय. नीता नहार ह्या सावटातील सामाजिक कार्यकर्त्या सांगतात की अनेक दिवसांपासून या सगळ्या भागात लोक रात्रभर पहारे देतायंत. गस्त घालताहेत. जरा कुठे अनोळखी व्यक्तिंबाबत कानावर कुणकुण जरी पडली तरी मोटारसायकलवर लगेच संशयित ठिकाणी फेरी मारून येणं, असे प्रकार सुरू आहेत.‌

सामाजिक कार्यकर्ते अक्षय तमायचेकरसुद्धा अफवांबाबत पुष्टी करतात. तमायचेकर सद्या लाॅकडाऊनमुळे मुंबईत असले तरी दाभाडी परिसरात त्यांचं शैक्षणिक प्रकल्पाचं काम सुरू आहे. एकंदरीत गडचिंचलेची घटना लाॅकडाऊन काळातलं नैराश्य, अफवा आणि त्यातून आलेल्या भयाने पछाडलेल्या लोकांकडून घडल्याचं दिसतंय.

अगदी बोईसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांनीही अज्ञान, अंधविश्वास, अफवा, संशयामुळे गावातील लोक भयभीत असल्याचं मॅक्समहाराष्ट्र ला सांगितलं. त्यांचा कोणावरही विश्वास नाही. पोलिस, डाॅक्टरसुद्धा त्यांना वेष बदलून आलेले गुन्हेगार वाटतात. यापूर्वीही २०१३ सालची जमावाने दोघांची हत्या केल्याची घटना बोईसर पोलिस ठाण्यात नोंद आहे, असं कसबे म्हणाले.

त्र्यंबकेश्वर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे पुजारी महाराज कल्पवृक्षगिरी उर्फ चिकने महाराज(७०) त्यांचे सहकारी महाराज सुशीलगिरी (३५) आणि वाहनचालक निलेश तेलगडे या तिघांची डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावाजवळ जमावाने हत्या केली. ही घटना सद्या देशभरात बहुचर्चित आहे, ती केवळ घटनेतील कौर्यामुळे नव्हें, तर त्यापाठोपाठ जोर धरलेल्या माध्यमांच्या घटनेला धर्मद्वेषी रंग देण्याच्या खोडसाळपणामुळे आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडी सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केल्यामुळे !

कोणा व्यक्तिंची हत्या, यापेक्षा साधूंची हत्या यावर जोर देऊन सदर घटनेला हिंदुत्ववादी दृष्टीने भाजपाने व माध्यमांनी देशासमोर सादर केले. भारताचे गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजय मोहन बिष्ट यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संपर्क साधण्यातून भाजपाला आपलं हिंदुत्ववादी राजकारण साधायचंय, हे स्पष्ट होतं. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत यावं, म्हणून भाजपाने एक मोठी मोहिमच राज्यात चालवली आहे. आयटीसेल मार्फत देशभरातील भाजपाईंच्या अकाऊंटस् वरून भाजपाने महाराष्ट्र सरकारविरोधात वातावरण बनवण्याचा प्रयत्न चालवलाय. त्या पार्श्वभूमीवर गडचिंचलेच्या घटनेने भाजपाच्या हाती आयतं कोलीत मिळालंय.

https://twitter.com/myogiadityanath/status/1252108576593793027?s=19

महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथील श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे सदस्य साधू असलेले कल्पवृक्षगिरी मुंबईतील कांदिवली पूर्वेला हनुमाननगरचे रहिवासी होते. तिथल्या पिंपळेश्वर मंदिरात ते पुजारी होते. त्यांच्यासोबत झुंडींकडून मारला गेलेला निलेश तेलगडे हा मंदिराच्याच शेजारी राहणारा. ५-७ वर्षांच्या दोन लहान मुलांचा बाप असलेल्या निलेशचा मृत्यू घटनेला धार्मिक रंग दिल्यानंतर सपशेल बाजूला पडलाय. सुशील गिरी जोगेश्वरीत राहणारे. कल्पवृक्षगिरींचे गुरू रामगिरी यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना सूरतला जायचं होतं.

लाॅकडाऊन असल्याने या मंडळींनी स्थानिक पोलिसांकडे प्रवासाची परवानगी मागितली होती. ती नाकारल्यानंतरही कल्पवृक्षगिरी यांचा सूरत जाण्याचा हट्ट कायम होता. हा हट्टाहास आणि कायद्याचं उल्लंघन तिघांना मृत्यूच्या दाढेत घेऊन गेला. मृत तिघे मुंबईहून थेट सूरतला चालले होते की त्र्यंबकेश्वरला जाऊन सूरतकडे चालले होते, याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही.

साधूंनी आततायीपणा केला, पण महाराष्ट्र पोलिसांनीही वेळीच मुंबईतच त्यांचा प्रवास रोखण्याचं कर्तव्य निभावलं असतं, तरी तिघांचा जीव वाचला असता. लाॅकडाऊन काळात प्रवास करण्यासाठीची परवानगी त्यांच्याकडे नसताना त्यांनी दोन-तीन जिल्हे ओलांडून मुंबई ते दादरा व नगर हवेली किंवा मुंबई ते त्र्यंबकेश्वर व पुन्हा दादरा व नगर हवेली, हा किमान दीड दोनशे किमी प्रवास केलाच कसा, या प्रश्नाचं उत्तर गृहखात्याला द्यावंच लागेल.

एका माहितीनुसार, हे तिघे आधी त्र्यंबकेश्वरला गेले व तिथून मोखाडा-जव्हार, दाभोसा, खानवेलमार्गे त्यांचा सिल्वासाला जाऊन गुजरातमध्ये प्रवेश करण्याचा विचार होता. दादरा व नगर हवेलीच्या सीमेपर्यंत गेलेसुद्धा; पण लाॅकडाऊनच्या कडक अंमलबजावणीमुळे त्यांना पुढे जाण्यास रोखण्यात आलं. त्यामुळे त्यांना माघारी परतावं लागलं. गडचिंचले या मार्गावर डावीकडे आहे. गावातील गस्तीवरील ग्रामस्थांनी ही गाडी जाताना पाहिली होती. ती लागलीच मागे येताना पाहून ग्रामस्थांच्या मेंदूतला संशय अधिक भयभीत आणि गडद झाला. आधी गस्तीवरच्या लोकांनी हल्ला केला. पोलिसांनी येऊन त्यांना ताब्यात घेतलं तोवर संशयित दरोडेखोरांची वार्ता गावात पोहचली होती. मोठा जमाव घटनास्थळी आला आणि पोलिसांना ऐकेनासा झाला. जमावाचं रुपांतर झुंडीत झालं होतं. अत्यंत क्रूरतेने त्या झुंडीने तिघांनाही लाठ्याकाठ्या दगडांनी ठेचून मारलं.

श्री पंच दशनाम जुना आखाडाच्या समाजमाध्यमात प्रसारित झालेल्या एका पत्रानुसार, साधूंसोबत ५० हजार रूपये व देवांचे सोन्याचे दागिने होते, जे लुटले गेलेत. पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, त्यात तथ्य नाही.

बेभान जमाव बघून पोलिसांनी स्थानिक जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांना बोलावलं होतं. पण झुंड ऐकण्यापलिकडे गेली होती. झुंडीने पोलिसांच्या आणि चौधरींच्याही गाड्यांवर हल्ला केला. अगदी हल्लेखोर आरोपींना अटक करायला गेलेल्या पोलिसांच्या पथकावरही दगडफेक झाली. हवेत राऊंड फायर करून पोलिसांना जमाव पांगवावा लागला.

काशिनाथ चौधरी हे तसे त्या भागातले लोकप्रिय राजकीय व्यक्तिमत्व आहे. त्यांचं लोक ऐकतील, असा पोलिसांचा कयास होता; पण तो खोटा ठरला. अफवांमुळे निर्माण झालेल्या संशयाने लोक इतके पछाडलेले होते की ते गावातीलही कोणाचं ऐकत नव्हते. पोलिसांना हा अनुभव नवा नव्हता. सदर घटनेच्या दोन दिवस आधी शिवसेनेचे कार्यकर्ते व नामांकित डाॅक्टर विश्वास वळवी यांच्यावर सारणी गावात हल्ला झाला, तेव्हाही हीच परिस्थिती होती.

स्वत: डॉ. वळवी यांनी मॅक्समहाराष्ट्र ला सांगितलं की ते आपल्या एका सहकारी डाॅक्टरासोबत धान्यवाटप करायला सारणी गावात गेले होते. याच गावात सप्टेंबर, २०१९ मध्ये म्हणजे सातच महिन्यांपूर्वी वळवींनी आपल्या वाढदिवसानिमित्त घराघरात वह्यावाटप केलं होतं. त्या वह्यांवर वळवींचा फोटोही आहे. पण सारणीत जमावाने त्यांना घेरलं, तेव्हा लोक असे वागले की जणू वळवी त्यांच्यासाठी अगदी अनोळखी आहेत. गावातील काही लोकांनी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. गावच्या सरपंचाने डाॅक्टरांची ओळख सांगून मध्यस्थी करायचा प्रयत्न केला तर जमाव त्यांच्याही अंगावर धावून गेला. दरम्यान, संधी साधून वळवींनी पोलिसांना संपर्क साधला. पण पोलिसांशीही जमावाचं वागणं तसंच होतं. जमावाने पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यात पोलिस निरीक्षक आनंद काळेंसहित सहा पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले. पोलिसांनी वेळेत येऊन जर सुरक्षित बाहेर काढलं नसतं, तर आपला जीव गेला असता, असं डॉ. वळवी म्हणाले. या घटनेतही सुमारे दोनशे जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. सुरुवातीला डॉ. वळवींना हा आपल्या राजकीय विरोधकांचा पूर्वनियोजित कट वाटला होता, पण एक दिवस सोडून गडचिंचलेची घटना घडल्यावर अफवांनी काय भयानक स्थिती करून ठेवलीय, ते त्यांच्या लक्षात आलं. आपल्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती सांगत, गडचिंचलेची घटना धार्मिक द्वेषातून झालेली नाही, त्यामुळे कोणीही त्या घटनेस धार्मिक रंग देऊ नये, असं आवाहन करणारा विडिओ वळवींनी आपल्या फेसबुक वाॅलवर पोस्ट केला आहे.

Full View

१४ एप्रिलच्या वळवींवरील हल्ल्याच्या सारणीतील घटनेनंतर १६ एप्रिलची गडचिंचलेची घटना घडली. दोन्ही घटनांत वेगवेगळ्या गावातील दोनदोनशे लोकांवर गुन्हे दाखल झाले, तरी १७ एप्रिलला पुन्हा मणीगंडन गिरी या मूळचा तामीळनाडूतील वेळ्ळूरचा असलेल्या मजुरावर घोलवड येथे तो पायी जात असताना हल्ला झाला. त्यात त्याच्या डोक्याला मार लागला. घोलवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश सोनवणे वेळीच पोहचल्याने मणीगंडनचा जीव वाचला. स्वत: सोनवणे यांनी ही माहिती मॅक्समहाराष्ट्र ला दिली.

गडचिंचले ते सारणी हे ४० किमीचं अंतर आहे, तर विरूद्ध बाजूला गडचिंचले ते घोडवल हे ५७ किमी अंतर आहे. घोडवल हे महाराष्ट्राच्या अगदी सीमेवरचं गाव आहे. याचा अर्थ उभाआडवा डहाणू तालुका अफवाग्रस्त झाला आहे.

डाॅक्टर विश्वास वळवींचं म्हणणं असं की या भागात मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची आवश्यकता आहे. पण ती मंत्रीसंत्री, अधिकारी, आमदार, खासदार या स्तरावरून होऊ शकणारी नाही. त्यासाठी गावागावांतील सरपंच, पोलिस पाटील यांनाच विश्वासात घ्यावं लागेल. कारण गुन्हा घडल्यावर स्वाभाविकरित्या कायदा आपलं काम करेल, पण कायद्याच्या धाकाने बदलणारी ही मानसिकता नाही. उलट, कारवाईच्या विरोधात मोठा असंतोष उभा राहू शकतो किंवा हितसंबंधित मंडळींकडून उभा केला जाऊ शकतो.

लाॅकडाऊन काळात रोजगार सुटल्याने आलेली वैफल्यग्रस्तता, दुर्गम भाग असल्याने पोलिसांचा सततचा धाक नसल्याने रिकाम्या डोक्यांनी गावात एकत्र येणं, कोरोना संसर्गाची टांगती तलवार, बाहेरच्या लोकांना गावबंदी करायची धडपड, अफवांचा बाजार, कमालीचा अंधविश्वास आणि व्यवस्थेवरचा अविश्वास व बेभान करणारं दारूचं व्यसन यांचा एकत्रित परिणाम एका मागोमाग एक होणाऱ्या हल्ल्यांमागे असू शकतो, त्यामुळे कुठलाही राजकीय किंवा धार्मिक कंगोरा नसतानाही, युपीतील साधूंची बदला घेण्याची भाषा परिस्थिती अधिक चिघळवू शकते.‌

गडचिंचलेची घटना १६ एप्रिलच्या रात्री घडलीय. पण भाजपाचा आयटी सेल १८ एप्रिलपासून सक्रीय झाला. घटनेचा विडियो बाहेर पडल्यावर. विडियोत ऐकू येणारी भाषा वारली आणि कोकणाची संमिश्र आहे. शिवाय आरडाओरडा, गोंगाट सुरू असल्याने कोण काय बोलतं ते समजून येत नाही. तरीही, त्या विडियोतील गदारोळातला मुस्लिम नावाशी साधर्म्य वाटणारा एक शब्द पकडून सदर घटनेसाठी मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. हिंदू जमाव साधूसंतांवर हल्ला करणारच नाही, असा प्रचार चालवण्यात आला. पण चोर, दरोडेखोरांच्या भयासोबत आणखी एक अफवा गावकऱ्यांच्या डोक्यात घर करून होती, ती म्हणजे कोरोनासंसर्ग वाढावा, म्हणून मुस्लिम लोक साधूंचाही वेष करून येऊ शकतात!

या अफवेने जर आपलं काम साधलं असं गृहित धरलं तर झुंडींनी एकप्रकारे, साधूंच्या वेषातील चोर, दरोडेखोरांची, किडनीसाठी मुलं पळवणाऱ्या टोळीची किंवा कोरोना पसरवू पाहणाऱ्या मुस्लिमांचीच हत्या केलीय, असं म्हणता येईल व मुस्लिमांविरोधातील विद्वेषी प्रचाराचाच दुष्परिणाम म्हणून या घटनेकडे पाहता येऊ शकेल. आता या अफवा कोण तयार करतं, कोण पसरवणं, त्यामागे काही सुनियोजित कटकारस्थान आहे का, आदिवासींमधील अज्ञानावर स्वार होऊन असा विखारी प्रचार करून साधूंची हत्या घडवून आणून महाराष्ट्रातील वातावरण अस्थिर करण्याचा कोणाचा काय डाव होता, ते हुडकून काढायचं मोठं आव्हान सरकार आणि पोलिसांसमोर आहे.

Similar News