मनिषा भांगे तीन गुंठ्यांत ७५ पीकं घेणारी महिला...

मनिषा भांगे, पतीच्या निधनानंतर खचून न जाता आपल्या मुलाच्या मदतीने 3 गुंठे शेतीत सेंद्रीय शेतीचा प्रयोग करत 75 पीक घेतली आहेत. पाहा मॅक्समहाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट खैरेवाडीच्या भांगे कुटुंबाचं सेंद्रिय शेतीचं मॉडेल राज्यातील आदर्श मॉडेल

Update: 2021-05-16 16:15 GMT

सध्या शेती क्षेत्रात उत्पन्न वाढवण्यासाठी विविध प्रयोग सुरू असून त्यासाठी विविध रसायनयुक्त खतांचा वापर केला जात आहे. शेतातील पालेभाज्या, फळे यांची लवकर वाढ व्हावी व त्यातून आर्थिक नफा मिळावा. यासाठी शेती क्षेत्रात केमिकलयुक्त खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. शेतात नैसर्गिकपणे येणाऱ्या पालेभाज्या, फळे बाजारात दिसेनाशा झाल्या आहेत. असे असताना खैरेवाडी येथील शेतकरी मनीषा भांगे आपला मुलगा गोरक्षनाथ भांगे यांच्या मदतीने सेंद्रिय शेती करून अवघ्या ३ गुंठ्याच्या शेतीत ७५ पिके घेतात. ही एक किमयाच म्हणावी लागेल. त्यांच्या या शेतीत विविध प्रकारच्या पालेभाज्या,फळझाडे,औषधी वनस्पती, वनझाडे यांची लागवड करण्यात आली आहे.


दररोजच्या जेवणातून केमिकलयुक्त पालेभाज्या,फळे यांच्या माध्यमातून लोकांच्या पोटात विष जात असताना मनीषा भांगे यांनी सेंद्रिय शेती करून नैसर्गिक पालेभाज्या व फळे आपल्या शेतात पिकवल्या आहेत. त्यांचा तीन गुंठे शेतीचा प्रयोग राज्यात आदर्श ठरला असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक शेती पाहण्यासाठी येतात.

मनीषा भांगे या खैरेवाडी ता.माढा,जिल्हा सोलापूर येथील रहिवाशी असून पतीच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मनीषा भांगे यांच्यावर आली. भांगे यांनी स्वतःला शेतीच्या कामात झोकून देऊन तीन गुंठ्यांत सेंद्रिय शेती विकसित केली. जिद्दीच्या जोरावर त्यांनी सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे.

या सेंद्रिय शेतीत फळझाडे,फुलझाडे,औषधी वनस्पती याबरोबरच मेथी वांगे,बटाटे,कांदे,मिरच्या,भेंडी,पालक,कोथिंबीर, शेवगा, भोपळा,पेरू,आंबे,चिकू अशा विविध प्रकारच्या फळे व पालेभाज्याची लागवड केली आहे. सध्या बाजारात कृत्रिमरीत्या फळे व पालेभाज्या पिकवून विक्री केली जात आहे. भांगे यांच्या तीन गुंठे शेतीतून निरोगी व विषमुक्त पालेभाज्या व फळे पिकवली जात आहेत. या तीन गुंठे शेतीतून नैसर्गिकरित्या पीक उत्पादन घेतले जात आहे.


मनिषा भांगे यांनी शेतीच्या बांधाचाही व्यवसायिक दृष्टीने विचार करून आपल्या नातवाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतीच्या बांधावर ४०० सागाच्या झाडांची लागवड केली आहे. भांगे यांच्या म्हणण्यानुसार, मुलगा २० किंवा २५ वर्षांचा होईपर्यंत ही झाडे देखील मोठी होणार आहेत. या झाडांची किंमत भविष्यात २० ते २५ लाख रुपये पर्यंत जाईल असे त्यांना वाटते. सागाच्या झाडांबरोबरच शेवग्याच्या शेंगांच्या झाडाची लागवड केली असून त्यातुन आर्थिक उत्पन्न सुरू केले आहे.

भांगे यांच्या सेंद्रिय शेती मध्ये पाच प्रकारची पीक पद्धती विकसित करण्यात आली आहे. यामध्ये फळझाडे,औषधी वनस्पती,भाजीपाला,वनझाडे,खत व्यवस्थापन यांचा समावेश आहे. भाजीपाला या पीक पद्धतीमध्ये गादी वाफे तयात करून वांगी,भेंडी,टोमॅटो, दोडका,कारले,दुधी भोपळा,घेवडा,मेथी,पालक,चुका,शेपू,कांदा,लसूण,रताळे आदी पिके घेतली जात आहेत. फळझाडे या पीक पद्धतीमध्ये अंजीर,केशर आंबा,चिकू पेरू,आवळा,जांबुळ,पपई, सीताफळ,केळी, मोसंबी,लोणच्याचे आंबे आदी फळपिकांचे उत्पादन घेतले जात आहे.


औषधी वनस्पती पीक पद्धतीमध्ये कोरफड,कडीपत्ता, पुदिना,तुळस,हादगा,शेवगा,आवळा,बदाम,गुंज वेल आदी औषधी वनस्पतींचे उत्पादन घेतले जात आहे. वनझाडे या पीकपद्धती मध्ये सरळ अशोक,लिंब,जट्रोपा, साग आदींचा समावेश आहे. या तीन गुंठा शेतीमध्ये झाडांचा पालापाचोळा गोळा करून चांगल्या प्रकारचे गांडुळ खत निर्मिती केली जात आहे.

या संदर्भात आम्ही मनिषा भांगे यांच्याशी बातचीत केली असता त्या म्हणाल्या... तीन गुंठ्यात आम्ही 75 प्रकारची पीक आम्ही घेत आहोत. गांडूळखतं जीवामृत दशपर्णी ही पीक देखील आम्ही लावली आहेत. माझ्या मुलासाठी नातवांसाठी मी सेंद्रीय पद्धतीने शेती पिकवत आहे. फळं, फुलं, पालेभाज्या आम्ही सेंद्रीय पद्धतीने आम्ही पिकवत आहोत.

मनिषा भांगे यांची मुलगी लता कोकाटे सांगते..गेली 10 वर्ष माझी आई सेंद्रीय पद्धतीने शेती करत आहे. आम्हाला भाजीपाला, फळ, फुलं हे सगळं आमच्यासाठी पिकवत आहे. हे सर्व ती सेंद्रीय पद्धतीने पिकवते.



 


त्यांचा मुलगा गोरक्षनाथ भांगे सांगतो... 3 गुंठ्यात 75 पीक ही शेती पद्धती निसर्ग पुरक आणि पोषण आधारीत पद्धती आहे. या तीन गुंठ्यात आम्ही 20 पेक्षा अधिक प्रकारची फळं झाडं 25 प्रकारचा भाजीपाला 12-13 प्रकारच्या औषधी वनस्पती,12-13 प्रकारची फूलं, 6 प्रकारची वनझाडं, हे सगळं 3 गुंठ्यांमध्ये केलेलं आहे. हे सगळं करण्याचा मुख्य उद्देश एका वर्षभरात कुटुंबाला लागणारा भाजीपाला,फळ दवाखान्यावरचा खर्च, बऱ्यापैकी थांबवता यावा. हा आहे. विशेष म्हणजे 60 बाय 50 जागेत हे सगळं बसवता येतंय. याच्यातून आपल्या कुटुंबांची पोषण सुरक्षा निश्चित होते. आरोग्यावरचा खर्चही वाचतो आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सगळं नैसर्गिक पद्धतीने पिकवलं असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या रसायनापासून आपलं कुटूंब सुरक्षित ठेवता येतं.

भांगे यांचा तीन गुंठा सेंद्रिय शेतीचा प्रयोग पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या अनेक भागातून लोक येतात. त्यांचे मार्गदर्शन घेतात. सेंद्रिय शेतीमध्ये किमान एका कुटुंबाला वर्षभर पुरेल इतके नैसर्गिक पालेभाज्या चे उत्पादन घेता येते. नैसर्गिक पालेभाज्या मुळे कुटुंबाचे आरोग्य सदृढ होण्यास मदत होते त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने सेंद्रिय शेती करावी असे आवाहन मनीषा भांगे व गोरक्षनाथ भांगे यांनी केले आहे.

सेंद्रीय शेतीची फायदे?

जमीनीची जलधारणक्षमता वाढते, जमिनीचे तापमान संतुलित राहतं

जमीन मऊ- भुसभुशीत झाल्याने पिकांची वाढ जोमदार होते.

रासायनिक खतांचा कमी प्रमाणात वापर होऊन प्रदूषण कमी होते.

जमिनीची धूप कमी होते.

किटक नाशकांचा वापर नसल्याने आणि रासायनीक खतांचा वापर केला गेला नसल्याने जमिनीचा पोत व दर्जा सुधारतो.

सेंद्रीय शेतीमध्ये इतर किटक नाशकांचा वापर होत नसल्याने अन्नघटकांचा ऱ्हास कमी होऊन त्यांची उपलब्धता दीर्घकाळ टिकते.

प्रदूषण कमी करून पर्यावरणाचा समतोल राखला जातो.

खर्चात बचत होते.

किटक नाशकांची विषारी अन्न पदार्थ खावी लागत नाहीत.

त्यामुळं मनुष्याचं आयुष्य वाढायला देखील मदत होते. त्यामुळं अलिकडच्या रोग राईच्या काळात मनिषा भांगे यांचं हे सेंद्रीय शेतीचं आदर्श मॉडेल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत.

Full View

Similar News