आता महिला एसटी बस चालवणार...

Update: 2019-02-09 04:52 GMT

एसटी महामंडळाने महिलांसाठी खूशखबर दिली आहे. एसटी महामंडळाने जाहीर केलेल्या मेगाभरतीसाठी आता ३०% जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. २४०६ पदावर महिलांची भरती केली जाणार आहे.

महिलांसाठी सुवर्ण संधी

महत्त्वाचे म्हणजे हलके वाहन चालवण्याचा एक वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही भरतीसाठी अर्ज करता येईल. त्याचबरोबर महिलांसाठी उंचीच्या अटींमध्ये सवलत देण्यात आली आहे. निवड झाल्यानंतर संबंधित महिला उमेदवारांना एसटी महामंडळातर्फे अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. यापूर्वी महिलांची उंची १६० सेंमी उंच असलेल्या उमेदवारांना भरतीसाठी पात्र धरले जात होते, मात्र आता उंचीची मर्यादा किमान १५३ सेंमी केली आहे. यासाठी आजपर्यंत २८९ महिला उमेदवारांनी अर्ज केला आहे. प्रशिक्षणानंतर महिला उमेदवाराला आरटीओ कडून परवाना प्राप्त झाल्यानंतर या महिला एसटीच्या बस चालवू शकतील. राज्यात एकूण महामंडळामार्फत ८ हजार २२ इतक्या चालक आणि वाहक पदाची भरती सुरू आहे. यामध्ये दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांसाठी ४ हजार ४१६ जागांसाठी भरती जाहीर केली असून इतर जिल्ह्यांसाठी ३ हजार ६०० नव्या जागांसाठी भरती शुक्रवारी जाहीर केली होती. यामध्ये अनेक महिला एसटीच्या नोकरीसाठी पुढे येताना दिसत आहेत. एसटी महामंडळ महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असेही रावते यांनी सांगितले.

Similar News