बीड तालुक्यातील नाळवंडी गावाचा ‘पाणीदार’ निर्धार

Update: 2019-05-06 15:59 GMT

दुष्काळाच्या नावानं ओरडत बसण्यापेक्षा दुष्काळावर मात करण्यासाठी बीड जिल्ह्यातील काही गावं पुढं सरसावली आहेत. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेऊन काही गावांनी श्रमदानाला मोठ्याप्रमाणावर सुरूवात केलीय.

बीड तालुक्यातील नाळवंडी गावाचा ‘पाणीदार’ निर्धार

बीड तालुक्यातील नाळवंडी गाव हे भाजीपाला, पेरू, कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. नाळवंडीचा कांदा, पेरू आणि भाजीपाला हे मुंबई पुण्यासारख्या महानगरांच्या बाजारात काही वर्षांपुर्वीपर्यंत जायचा. मात्र, मागील सहा-सात वर्षांपासून दुष्काळाची तीव्रता वाढत चाललीय. त्यामुळं उत्पादनच कमी होऊ लागल्यानं भाजीपाला, पेरू आणि कांद्याचा पुरवठा करणाऱ्या नाळवंडीची ती ओळखही पुसू लागली आहे.

आज नाळवंडी गावाची तहान टँकरच्या माध्यमातून भागवण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. त्यामुळं दुष्काळाचा कलंक दूर करण्यासाठी नाळवंडीत मोठ्या प्रमाणावर श्रमदानाचं 'तुफान आलय'. गावात श्रमदान करण्यासाठी गावकऱ्यांसह ग्रामसेवक संघटना, प्राध्यापक- शिक्षक संघटना, डॉक्टर, वकील, पत्रकार हे सुद्धा पुढे आले आहेत. त्यामुळं नाळवंडी गावानं आता ‘पाणीदार’ होण्याचा निर्धार पूर्ण करायला सुरूवात केलीय.

नाळवंडी शिवारातील बांधबंदिस्ती, नंद्याचं खोलीकरण करण्यावर ग्रामस्थ भर देत आहेत. याशिवाय पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीमही राबवली जातेय. आपला विकास आपणच करायचा, असा निर्धार ग्रामस्थांनी केलाय. त्याला पाणी फाऊंडेशनची मदत मिळतेय. श्रमदानातून नाळवंडीचं गतवैभव पुन्हा मिळवण्यासाठी ग्रामस्थ अहोरात्र श्रमदान करत आहेत. नाळवंडीच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन वृक्षतोड बंदीचा ठराव देखील पास केला आहे. परिसरात वृक्षतोड करण्यावर ग्रामस्थांनीच बंदी टाकलीय. वृक्षतोड करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय देखील ग्रामस्थांनी घेतलाय.

लहान मुलांसह वयोवृद्ध नागरिकही ‘पाणीदार’ गावासाठी दररोज श्रमदान करत आहेत. पाण्यासाठी इतर ठिकाणी भांडण, वाद होत आहेत. अशा परिस्थितीत नाळवंडीच्या ग्रामस्थांनी दुष्काळाशी दोन हात करत एकमेकांची जिरवण्यापेक्षा पावसाचं पाणीच जमिनीत जिरवण्यावर भर द्यायला सुरूवात केलीय. त्यामुळं दुष्काळासाठी कुठल्याही मदतीची वाट न पाहता नाळवंडीच्या ग्रामस्थांनी श्रमदानातून दुष्काळमुक्तीसाठी उचललेलं पाऊल त्यामुळंच महत्त्वाचं आहे. प्रशासन, सरकार, खासगी संस्थांचे दुष्काळमुक्तीचे प्रयत्न सुरूच आहेत. मात्र, त्यापुढे जाऊन स्वतःहून पुढाकार घेत ग्रामस्थांनी आता दुष्काळाचा कलंक मिटवण्यासाठी कंबर कसलीय.

दुष्काळाच्या तात्पुरत्या मदतीवर अवलंबून राहण्याऐवजी ग्रामस्थांनी एकोप्यानं स्वतःहून काही निर्बंध घालून घेतलेले आहेत. त्यामुळं पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब साठवून तो जमिनीत जिरवून दुष्काळावर मात देण्याचा नाळवंडीच्या ग्रामस्थांचा निर्धार कितपत यशस्वी झाला हे पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यात दिसेलच.

Full View

 

Similar News