आज पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून महिलाही नोकरी, व्यवसाय करु लागलेल्या आहे. यात आणखी भर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मोदी सरकारच्या काळात देशातील नागरिकांच्या हाताला काम मिळण्यापेक्षा कोट्यावधी लोकांच्या हातचे काम गेले आहे. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ (सीएमआयई) या संस्थेच्या ताज्या अहवालात बेरोजगारीचे भयानक वास्तव समोर आले आहे. देशात 2018 मध्ये एक कोटी नऊ लाख कामगारांनी नोकरी गमावली असून यात सर्वात जास्त महिला बेरोजगार झाल्याचा अहवाल ‘सीएमआयई’ने दिला आहे.
सर्वात जास्त महिला बेरोजगार
या अहवालानुसार सर्वात जास्त फटका ग्रामीण भागाला बसला असून तब्बल 88 लाख महिला 2018 मध्ये बेरोजगार झाल्या आहेत. त्यात शहरातील 23 लाख महिला बेरोजगार झाल्या असून यात सर्वाधिक 65 लाख महिला ग्रामीण भागातील आहेत.
मोदी सरकारच्या काळात ग्रामीण भागात बेरोजगारांची संख्या वाढली…
भारत हा खेड्यांचा देश आहे. भारतातील बहुतांश लोकसंख्या ही खेड्यात राहते. या अहवालानुसार शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बांधकामाच्या ठिकाणी मजुरी करणाऱ्या कामगारांमध्ये बेरोजगारी प्रचंड आहे. हाताला काम नसल्याने शेतमजूर, मोलमजुरी करणाऱ्या स्त्रियांवर उपासमारीची वेळ आली आहे. शहरीभागातही 23 लाख महिला बेरोजगार झाल्याने त्यांना घरी बसण्याची वेळ आली आहे. सरकारने रोजगार उपलब्ध करु असे आश्वासन देऊन स्त्रियांच्या हातातील रोजगार हिसकावून घेतला आहे अशी ओरड अनेक महिला करत आहे.