रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील चिवे येथिल धडाडीच्या आंदोलनकर्त्या म्हणून प्रसिध्द असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या लताताई कळंबे यांच्याकडे नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या प्रमुख उपस्तीतीत रायगड जिल्हा महिला आघाडीच्या सचिवपदाची धुरा सोपविण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यकुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून राजाभाऊ चौगुले व स्नेहलताई जाधव यांच्या पुढाकाराने लताताई कळंबे यांच्यासह पोलादपूर, पनवेल, सुधागडसह जिल्ह्यातील शेकडो युवक, महिलांनी मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला. यावेळी लताताई कळंबे यांना सन्मानपुर्वक नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे आता रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संघटनात्मकदृष्ट्या अधिक बळकटी मिळणार आहे.
रायगड जिल्ह्यात मनसेचे इंजिन आता अधिक जोरात धावणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मनसेत नव्याने दाखल होणाऱ्या या कार्यकर्त्यांमुळे मनसेचा गड दिवसेंदिवस भक्कम होत असल्याचे दिसून येत आहे. लताताई कळंबेच्या मनसे प्रवेशाने जिल्ह्यातील मनसे पदाधिकरी कार्यकर्त्यांत आनंदाचे व उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक कार्यकर्त्या म्हणून लताताई कळंबे यांनी अनेक आंदोलने व चळवळी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. मात्र आता मनसेसारख्या बलाढ्य आणि सामाजिक अस्मितेच्या प्रश्नावर रोखठोक आवाज उठविणार्या राजकीय पक्षाची भरभक्कम साथ मिळाल्यामुळे लताताई कळंबे यांच्या चळवळी व आंदोलनाला अधिक धार मिळणार आहे.
लताताई कळंबे यांनी आपल्या कार्यकतृत्वाचा आगळावेगळा ठसा उमटविलेला आहे. रायगड जिल्ह्यात लताताई कळंबे यांच्या नावाचा आगळावेगळा दरारा आहे. कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे तर केवळ समाजहितासाठी लढणाऱ्या या रणरागीनीच्या कार्याची दस्तरखुद्द राज ठाकरे यांनी योग्य ती दखल घेतली आणि कळंबे यांच्यावर जिल्हा सचिव पदाची धुरा सोपवली. राज ठाकरे यांचे प्रभावी वक्तृत्व व बेधडक नेतृत्वगुंणांचा प्रभाव लताताई कळंबे यांच्यावर असून पहिल्यांदा राजकीय क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर मनसे पक्षात “मनसे काम” करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मनसे पक्षात अधिकाधिक लोकोपयोगी व समाजाभिमुख कामे करण्यास वाव असल्याने त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. लताताई कळंबे यांच्या मनसे प्रवेशाने रायगड जिल्हा मनसेचा गड अधिक भक्कम व मजबूत झाला आहे. मनसे पक्षात जाहीर प्रवेश केल्यानंतर लताताई कळंबेचे मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. जिल्ह्यातील तरुणाई मनसेला अधिकाधिक पसंती देत असल्याने आगामी काळात मनसेचे इंजिन अधिक गतीने आगेकुच करणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.