कायम वादग्रस्त विधान करुन आपल्या पक्षासाठी अडचणी निर्माण करणाऱ्या चर्चित खासदार सावित्रीबाई फुले यांनी भाजपला राजीनामा दिला आहे. पुन्हा त्यांनी आपला राजीनामा देताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या आहेत की, भाजपा समाजात फूट पाडण्याचा कट रचत आहे. असे विधान त्यांनी केले आहे. त्यांनी याआधी भगवान हनुमान यांच्याविषयी देखील असेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, भगवान हनुमान हे मनुवादी लोकांचे गुलाम होते. जर हनुमान दलित नसते तर त्यांना मनुष्य का बनवण्यात आले नाही ? त्यांना वानरच का केले ? त्यांचा चेहरा काळा का केला, असे वादग्रस्त प्रश्न त्यांनी उभे केले होते. त्यांनी या आधी खुपदा असे वादग्रस्त विधान भाजपच्या बाबतीत केले आहे. राम मंदिराच्या संदर्भात त्यांनी म्हटले होते की, राम मंदिर हे मंदिर नसून देशातील ३ टक्के ब्राह्मणांच्या कमाईसाठीचा धंदा आहे, तसेच भगवान राम हे शक्तीहीन आहेत. त्यांच्यात शक्ती असते तर अयोध्यामध्ये तेव्हाच राम मंदिर उभारले असते, असे आरोप त्यांनी यावेळी केले होते. त्यांनी आरक्षणाच्या वादात देखील भाजपवर निशाणा साधला होता. मी भाजपाची नव्हे तर दलिताची मुलगी आहे. आरक्षण संपवण्याचा कट रचला जात आहे. मी जर खासदार झाले नसते तर भाजपाला बहराईच मतदारसंघ राखता आला नसता. भाजपाला नाईलाज होता. त्यांना विजय मिळवून देणारा उमेदवार हवा होता. त्यामुळे त्यांनी मला तिकीट दिले. मी त्यांची गुलाम नाही. खासदार होऊनही जर मी माझ्या लोकांसाठी बोलू शकत नसेल तर काय फायदा, असे घणाघाती विधान त्यांनी भाजपाबाबत केले होते.