इतिहासात पहिल्यांदाच शबरीमाला मंदिरात महिलांनी प्रवेश केला आहे. ५० वर्षापेक्षा कमी वयाच्या स्त्रीयांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. मात्र आज ५० वर्षा पेक्षा कमी वयाच्या महिलांनी या मंदिरात प्रवेश केला. बिंदू आणि कनकदुर्गा अशी या महिलांची नावं आहेत.
आज पहाटे या महिलांनी शबरीमाला मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. सर्वोच्च न्यायालयाने सर्व महिलांना या मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. आज या निर्णयाची अंमलबजावणी या महिलांनी केली.
काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय?
शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात दहा ते ५० या वयोगटातील महिलांच्या प्रवेशावर सुमारे ८ शतकांपासून असलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने बहुमताने रद्दबातल ठरवली. शारीरिक रचनाभिन्नतेच्या मुद्दय़ावर महिलांवर अन्याय करणाऱ्या आणि राज्यघटनेशी विसंगत असलेल्या कोणत्याही प्रथेचे समर्थन केले जाऊ शकत नाही, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी आपल्या निकालात म्हटलं आहे.