नवी दिल्ली - भारताच्या विविध भागांना भेटी देण्यासाठी लाखो पर्यटक दरवर्षी भारतात येतात. इथल्या पर्यटन स्थळाच्या प्रेमातही पडतात. मात्र, व्हिसाचा कालावधी संपल्यानंतर आपापल्या देशात परतही जातात. अशीच एक महिला पर्यटक उत्तर प्रदेशातील मथुरा फिरायला आली होती. एका प्रसंगानं तिच्या उभ्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली.
फ्रेडरिक एरिना ब्रूनिंग या सुमारे २५ वर्षांपुर्वी जर्मनीतून भारतात पर्यटनासाठी आल्या होत्या. मथुरेत फिरतांना एरिना इथल्या गायींच्या प्रेमात पडल्या. त्याचवेळी त्यांनी जर्मनीत न परतण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी गोमातेची सेवा करायला सुरूवात केली. जखमी आणि भटकंती करणाऱ्या गायींवर नियमित वैद्यकीय उपचार करायला एरिना यांनी सुरूवात केली. त्यांच्या याच कार्याची दखल घेत केंद्र सरकारनं त्यांना यावर्षी पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलंय.
लोकवस्तीपासून दूर एका शांत आणि गलिच्छ परिसरातील एका गोशाळेत एरिना सध्या १८०० पेक्षा अधिक गायी आणि त्यांच्या वासरांचं पालनपोषण करत आहेत. त्यामुळं स्थानिक लोकं एरिना यांना सुदेवी माताजी अशा नावानं बोलावतात. ६१ वर्षीय एरिना यांना या गायी आणि वासरांचा सांभाळ कऱण्यासाठी दरमहा सुमारे ३५ लाख रूपयांचा खर्च येतो. या गोशाळेत ६० कर्मचारी काम करत आहेत. त्यांचं वेतन आणि गायींच्या अन्न-पाण्यासाठी येणारा खर्च मोठ्या प्रमाणावर आहे. एरिना यांना त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीतून दरमहा सुमारे ७ लाख रूपये मिळतात, ते सर्व पैसे त्या गोमातेच्या पालनपोषणावरच खर्च करतात. या पुरस्कारानं अत्यंत आनंद झाला असून लोकांनी प्राणी-मात्रांवर दया करावी, असा संदेश एरिना देतात.