नाशिक मधील पुणतांबा येथे शेतकऱ्यांच्या लेकींनी अन्नत्याग आंदोलन सुरु केलं असून अाज आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. आपल्या मागण्या जो पर्यंत मान्य होत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं या मुलींनी म्हटलं आहे. दरम्यान आज पाचव्या दिवशी शुभांगी जाधव हिची प्रकृती खालावत असून तिला अहमदनगरमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पाच दिवस झाले तरी या कृषी कन्यांच्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली नाही. प्रशासनाने आंदोलनाकडे दुलर्क्ष केल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थ आज रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.
काय आहेत शेतकऱ्यांच्या मुलींच्या मागण्या?
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा
शेतीमालाला हमी भाव द्या
सरकट कर्ज माफी
दुधाला 50 रु प्रतिलिटर प्रमाणे भाव द्या
या मागण्यांसाठी पुणतांबा येथे निकीता जाधव , शुभांगी जाधव आणि पुनम जाधव या तिघी गेल्या पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलनास बसल्या आहेत. मात्र सरकारला अद्याप जाग आली नाही.
दरम्यान, आंदोलनासाठी विविध संघटनांनी मुलींची भेट घेऊन पाठींबा दिलाय आणि आज पाचव्या दिवशी पालकमंत्री राम शिंदे या मुलींची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय. अनेक शेतकऱ्यांचे आंदोलन, उपोषण पाहिले मात्र शेतकऱ्यांच्या लेकींचे आंदोलन पहिल्यांदाच अशा पद्धतीने सुरु आहे. ज्या वयात या मुलींनी शिक्षणाकडे भर दिला पाहिजे त्याठिकाणी आज त्यांना नाईलाजाने सरकारविरोधात आंदोलन करावं लागतंय कधी प्रशासनाला जाग येणार. मुख्यमंत्री या कृषीकन्यांच्या आंदोलनाकडे लक्ष देणार का त्यांना कुठलही आश्वासन न देता मागण्या पूर्ण करतील का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.