बचत गटांना सक्षम बाजार पेठा मिळाव्यात यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आता ई काॅमर्स सारख्या सक्षम माध्यामाची साथ मिळायला सुरूवात झाली आहे.
आज बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर बचतगट आणि ग्रामीण कारागीरांनी बनवलेल्या उत्पादनांच्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. येत्या ४ फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन आणि विक्री सुरु राहणार असून या प्रदर्शनात देशभरातील बचतगट सहभागी झाले आहेत.
ऍमेझॉन, फ्लिपकार्टच्या धर्तीवर बचतगटांची उत्पादने आता ‘महालक्ष्मी ई-सरस’ या मोबाईल ऍप तसेच वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत. प्राथमिक टप्प्यात या ऍपवर बचतगटांची ५० उत्पादने उपलब्ध करुन देण्यात येणार असून या माध्यमातून राज्यातील महिला बचतगट चळवळीला तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.
या प्रदर्शनात ५११ स्टॉलच्या माध्यमातून विविध उत्पादनांची विक्री केली जाणार आहे. याशिवाय इथं खाद्यपदार्थांचे ७० स्टॉल असून त्यातून मुंबईकरांना वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींचा आस्वादही घेता येणार आहे.