कोरोना नुकताच आपले हात-पाय राज्यात पसरवत होता. लॉकडाऊन चा अर्थ आता कुठे लोकांना हळू-हळू उमजत होता. याच वेळी म्हणजेच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक्सप्रेस समुहाने, पगार कपातीचा निर्णय घेतला.
या निर्णयाने संपुर्ण पत्रकार मंडळींना पुढील संकटाची चाहुल लागली. म्हणतात ना, पोलिस अन पत्रकार हेच फक्त आपत्तीकडे धावत जातात. तर बाकीचे सर्व आपत्ती पासुन दूर पळतात. अगदी याप्रमाणेच आपल्या जीवाची, आपल्या स्वकीयांच्या जीवाची पर्वा न करता ही मंडळी अशा भीषण परिस्थितीत सुद्धा वार्तांकन करत असतात.
याचाच दाखला द्यायचा झाला तर काल-परवाच एका इंग्रजी वाहिनीच्या सहा पत्रकारांना कोरोनाची लागण झाली. या आधी भोपाळ मध्ये एका पत्रकार कोरोनाग्रस्त आढळला. अशा संकटांना तोंड देत वार्तांकन करणाऱ्या अशा बर्याच पत्रकारांना काही नामवंत माध्यमसमुहांनी कोरोना आणि आर्थिक मंदीचे कारण दाखवुन घरचा रस्ता दाखवला.
पत्रकार निखिल वागळे यांनी हिंदुस्थान टाईम्स ग्रुप मराठी वेबपोर्टल बंद करत आहे का ? असा सवाल ट्विटर वर केल्यानंतर या सर्व चर्चेला तोंड फुटले. सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, हिंदुस्थान टाईम्स मराठी ने त्यांच्या सर्व च्या सर्व म्हणजेच ५ पत्रकारांचे राजीनामे घेतले असुन 30 एप्रिल हा त्यांच्या नोकरीचा शेवटचा दिवस असणार आहे.
पाठोपाठ, टाईम्स सारख्या बड्या माध्यम समुहाने देखिल त्यांच्या 'संडे टाईम्स' ची पुर्ण टीम घरी बसवल्याचे वृत्त आले. या वृत्ताला दुजोरा देणारी पोस्ट नोना वालिया यांनी फेसबुकवर शेअर करण्यात आली आहे. नोना या संडे टाईम्स सोबत गेली २४ वर्षे कार्यरत होत्या. अशा जेष्ठ पत्रकारांवर ही वेळ आल्यामुळे आता इतरांचे काय असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
या सोबतच, आउटलुक या माध्यमसमुहाने त्यांचे प्रिंट पब्लिकेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 'न्युज नेशन' या इंग्रजी वृत्त संकेतस्थळाने त्यांच्या एकुण स्टाफ पैकी जवळपास १६ जणांना घरचा रस्ता दाखवला आहे. हे सर्व होण्याच्या आधीच, 'क्विंट' या समुहाने सुद्धा त्यांच्या निम्म्या टीम ला बिनपगारी सुट्टीवर पाठवले आहे. तर असे ही सांगण्यात येत आहे की, 'इंडिया टुडे' समुहाने त्यांच्या जवळपास ४६ पत्रकार, ६ कॅमेरामन आणि १७ प्रोड्युसर (निर्माता) ची यादी तयार केली आहे, की ज्यांना कोणत्याही क्षणी काढण्यात येणार आहे.
पत्रकारिता या धंद्यातील श्वाश्वतता यावर नेहमीच चर्चा करण्यात येते. पण आज पुन्हा एकदा कोराना च्या निमित्ताने हा विषय समोर आला. आणि म्हणुनच या बदला च्या रेट्या मध्ये पत्रकारांना स्वत:ला ही बदलावे लागेल. पत्रकारितेची मुल्ये जरी तीच असली तर पत्रकारितेचा फॉर्म बदलत जाणार आहे. आणि या बदला मध्ये जे पत्रकार आपली उपयुक्तता टिकवतील तेच टिकतील, अन्यथा बाजुला पडतील हे मात्र खरे.