बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर सध्या राजकारणात येणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधून अभिनेत्री करिनाला लोकसभेची उमेदवारी देण्याचा आग्रह काँग्रेसच्या नगरसेवकांनी धरला आहे. कारण करिना तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय असल्यानं भोपाळ मतदारसंघ जिंकणं सोपं होईल, असं राजकीय गणित काँग्रेस नगरसेवकांनी मांडलं आहे.
भोपाळ लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाकडे आहे. भाजपाच्या या बालेकिल्ल्यात काँग्रेसची डाळ शिजत नाही. त्यामुळे भाजपाचा पराभव करण्यासाठी करिना कपूर यांना उमेदवारी द्या, असा आग्रह काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाकडे धरला आहे. करिनाचा चाहतावर्ग प्रचंड आहे. याचा मोठा फायदा करिना कपूर आणि पर्यायानं काँग्रेसला होईल, असा दावा काँग्रेस नगरसेवक गुड्डू चौहान आणि अनीस खान यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केलं आहे.
करिनाचा पती सैफ अली खान आणि भोपाळ यांचा घनिष्ठ संबंध आहे. पतौडी कुटुंब अनेक वर्षांपासून भोपाळमध्ये वास्तव्यास आहे. सैफ, करिना, शर्मिला टागोर, सोहा अली खान अनेकदा भोपाळला येतात. भोपाळ आणि पतौडी घराण्यातील याच कनेक्शनचा फायदा करिनाला होईल, असा विश्वास काँग्रेसमधील अनेक नेत्यांना वाटतो. लवकरच यासाठी काँग्रेसचे नगरसेवक मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेणार आहेत.