जयललिता अजूनही चर्चेत
काही माणसं जीवंतपणी जितकी चर्चेत असतात तितकीच मृत्यूनंतरही. जयललितांच्या बाबतीत ही असंच काहीसं आहे. तामिळनाडूच्या राजकारणात मृत्यूनंतरही त्या अजूनही जीवंत आहेत. सध्या त्यांचं नाव चर्चेत आहे, हॉस्पिटल बिलामुळे. हॉस्पिटलमधल्या उपचाराचे पैसे अजूनही शिल्लक असल्याने अपोलो हॉस्पिटलने चौकशी समितीपुढे बिलाचं विवरणच दिलंय. त्याप्रमाणे जयललिता यांच्या वैद्यकीय उपचाराचा एकूण खर्च 6.86 कोटी रूपये झाल्याचं सांगण्यात आलंय. त्यातील 2 कोटी रूपये हॉस्पिटल मधल्या रूम्स आणि इतरांसाठी पुरवण्यात आलेल्या जेवणावर खर्च झाले आहेत. झालेल्या एकूण बिलापैकी 44 लाखंचं बिल अजूनही भरण्यात आलेलं नसल्याचं ही अपोलो हॉस्पिटलने सांगीतलंय.
1.24 कोटी रूपये हे जयललितांची काळजी घेणाऱ्या स्टाफ आणि पक्षाच्या नेत्यांच्या राहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या खोल्यांसाठी तर 1.17 कोटी रूपये त्यांच्या खाण्यावर खर्च झाला आहे. हा खर्च जयललितांच्या थेट उपचाराच्या व्यतिरिक्त झालेला खर्च आहे, आणि सर्व बिलं पक्षाने दिली असल्याचं अपोलो हॉस्पिटलचं म्हणणं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, जयललितांना ठेवण्यात आलेल्या मजल्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे पोलीसांच्या सूचनांवरून बंद ठेवण्यात आल्याचंही अपोलो रूग्णालयाने आपल्या स्टेटमेंट मध्ये म्हटलं आहे.
22 सप्टेबर रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे जयललितांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 5 डिसेंबर रोजी त्यांचा ह्रदयक्रीया बंद पडल्याने मृत्यू झाला. जयललितांच्या मृत्यूच्या कारणांची चौकशी करणाऱ्या निवृत्त न्यायाधीश ए. अरूमुगास्वामी यांच्या आयोगापुढे सध्या साक्षीपुरावे तपासण्याचं काम सुरू आहे.