भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांना कोव्हिड काळात का हवाय हमीभाव?

लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याची मागणी घटली आहे. त्यामुळं भाजीपाल्याचे भाव पडले असून आता या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भाजीपाल्याला हमीभाव देण्याची मागणी केली आहे.... पाहा मॅक्समहाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट

Update: 2021-04-24 13:35 GMT

बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, यंदा चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी पिकांची पेरणी केली होती. कोणी भाजीपाला केला. तर कोणी गव्हाची पेरणी. मात्र, सततचा दुष्काळ भोगत असलेल्या बीडच्या शेतकऱ्यांच्या खिशात यंदाही दोन पैसे येता येता राहिले. कारण कोरोना काळात फळ, भाज्या कवडीमोलानं विकाव्या लागत आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.....!

अगोदरचं दुष्काळ,अवकाळीने इथला शेतकरी पिचलेला आहे. आणि त्यात आता कोरोनाने थैमान घातलंय. यामुळं जिल्ह्यातील आठवडी बाजारांसह, छोट्या- मोठ्या बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांसमोर रक्ताचं पाणी करून पिकवलेली फळभाजी कुठं विकावी? असा प्रश्न आहे. तर दुसरीकडं सर्वत्र लॉकडाऊन असल्यानं भाजीपाला किरकोळ विक्रीला, सकाळी 7 ते 11 पर्यंतचं प्रशासनाने वेळ दिलाय. यादरम्यान भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळं या शेतकऱ्यांनी त्यांच्या भाजीपाल्याला आता हमीभाव द्यावा. अशी मागणी सरकारकडे केली आहे. बाजारात तीन तासच भाजीपाला विकावा लागत आहे. त्यामुळं मागणी घटली असून भाजीपाल्याला भाव राहिलेला नाही. नेहमी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बीडच्या भाजी मार्केटमध्ये जर आज आपण नजर टाकली तर आपल्या चेहरा पडलेले शेतकरी पाहायला मिळतात.


बीडच्या किरकोळ भाजीमार्केटमध्ये कोणत्या भाजीला किती भाव आहे.

बटाटे - 10 रुपये किलो

कांदा - 10 रुपये किलो

टोमॅटो - 5 रुपये किलो

भेंडी - 20 रुपये किलो

दोडके - 20 रुपये किलो

पत्ता कोबी - 10 रुपये किलो

कारले - 20 रुपये किलो

लसूण - 60 रुपये किलो

बिट - 20 रुपये किलो

वांगे - 15 रुपये किलो

असा कवडीमोल भावात भाजीपाला विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय..

काय आहे सरकारचा नवा नियम?

भाजीपाला विक्रेत्यांनी सकाळी 7 ते 11 ही वेळ भाजी विक्री करण्यासाठी दिली आहे. निर्बंध लागू असतानाही लोक भाजीपाला आणि किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याने सरकारने सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंतच भाजीपाला आणि किराणा विकण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या संदर्भात मॅक्समहाराष्ट्र ने काही भाजीपाला विक्रेत्या शेतकऱ्यांशी बातचीत केली. ते म्हणाले

शासनाने आम्हाला 3 तास भाजीपाला विकण्यासाठी वेळ दिलाय. त्यात असा कवडीमोल भाव मिळत आहे. आज खर्च जास्त आणि उत्पन्न कमी निघत आहे. त्यामुळं मोठं नुकसान होत आहे. तर याविषयी दुसरे शेतकरी म्हणाले, की आज कोणत्याच भाजीपाल्याला भाव नाही. बेभाव माल विकावा लागतोय. त्यामुळं शेतकरी हवालदिल झालाय. तर भाजीपाला विकण्यासाठी देखील जास्त वेळ दिला जात नाही. 11 वाजले की कर्मचारी येतात आणि आमचा भाजीपाला फेकून देतात.

मॅक्स महाराष्ट्राने एका भाजी विक्रेत्या महिलेशी चर्चा केली असता त्या म्हणतात - ''पन्नासची जुडी आणलेली कोथिंबीर विकली जात नाय. १० वाजेपर्यंत माणसं घराबाहेर पण पडत नाहीत. तर मग ११ वाजता दुकान बंद करून उरलेला माल फेकून द्यायचा का? घेतलेल्या मालाचं पैसं कसं द्यायचं?''

७ ते ११ वाजेपर्यंतच भाजी विकायची ११ वाजले की, लगेच काठ्या घेऊन हाणायला येत्यात. २० रुपये किलोंनी आणलेला माल १० रुपये किलोंनी विकायचा. घेतलेल्या मालाचे पैसे तर आले पाहिजेत. १००० रुपयाचा माल असतो रोजचा.



 


पुढे घरची परिस्थिती सांगतांना त्या म्हंटल्या... घरात खायला सुद्धा काहीच नाही. १० रुपयाची मुश्किल झालीये. रिक्षा बंद सगळं बंद येईला जायला वाहतूक नाही. एवढ्या लांब पाई - पाई जायचं घरला. निदान २ - ३ वाजेपर्यंत विकू दिलं तर आम्हाला पण रुपया आठाणा मिळलं तेवढंच आम्ही बी घरला जाऊन दोन घास खाऊ.'' अशी प्रतिक्रिया भाजी विक्रेत्या महिलेने मॅक्समहाराष्ट्रने दिली.

एक भाजी विक्रेता म्हणतो... टोमॅटो वांगी सगळ्याचे भाव उतरलेत. टोमॅटो ५ रुपये किलो, वांगी १० रुपये किलो परवडत नाहीये. खर्च जास्त पण उत्पन्न कमी निघायला लागलाय. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाहीये. आणि ११ वाजता बंद करायचा म्हंटलं की आमचं नुकसान होतं. कमी भावात माल खपवावा लागतो.

एका कांदे बटाटे विक्रेत्यांशी चर्चा केली असता मॅक्समहाराष्ट्रासोबत बोलताना ते म्हणाले - 3 तास विक्री करतो आहोत. त्यात पण कांदे १० रुपये किलो, बटाटे १५ रुपयेला किलो आणि लसूण २० ला पाव या भावात परवडत नाही. तीन तासांत काय विकायचं ? असा प्रश्न त्यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना उपस्थित केला आहे.



 एका संतप्त शेतकऱ्याने आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं... शेतकरी बेभाव माल विकायला लागलाय. शेतातून माल इथंपर्यंत आणायला सुद्धा परवडत नाहीये. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. कोणत्याचं मालाला भाव नाहीये सध्याला. कांदा भाजीपाला सगळ्याचे भाव उतरलेत. या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे उत्पन्न चांगलं आलं पण योग्य भाव मिळत नाहीये.

दरम्यान प्रत्येक पक्ष सरकार आलं, की शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव देऊ असं आश्वासन देतो. मात्र, निवडून येताच या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळत नाही. त्यामुळे आतातरी या दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हे सरकार हमीभाव देऊन आधार देणार का? असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

त्यामुळं सरकारने एक तर भाजीपाला विक्रीचा वेळ वाढवावा. अन्यथा शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला हमीभाव देऊन भरीव मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळं सरकार आता या मागणीकडे कसं पाहतं पाहणं गरजेचं आहे.

Full View
Tags:    

Similar News