मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा असो की छोटेखानी कार्यक्रम तो एखाद्या प्रोफेशनल इव्हेंटप्रमाणेच असतो. त्यात राज यांचा मुलगा अमित याचा विवाहसोहळा अगदी दिमाखात, थाटामाटात आणि भव्यदिव्यपणे पार पडला. या लग्नासाठी मनसेचे पदाधिकारी नियोजनात होते. राज यांच्या घरातील पहिलं लग्न म्हणून कुठलीही कसर राहू नये, याची काळजी कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी घेतल्याचं दिसत होतं.
महाविद्यालयीन काळातील मैत्रिण मिताली बोरूडेसोबत आज ठाकरेंचे ‘राज’पूत्र अमित याचा विवाहसोहळा पार पडला. मुंबईतल्या लोअर परळ इथल्या सेंट रेजिस या अलिशान हाँटेलमध्ये दुपारी १२ वाजून ५१ मिनिटांनी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला.
अमित-मितालीचा साखरपुडा डिसेंबर २०१८ मध्ये अत्यंत साधेपणानं पार पडला होता. त्यामुळं विवाहसोहळाही असाच साधेपणानं पार पाडला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून राज यांच्या दादर इथल्या कृष्णकुंज इमारतीसह परिसराला रोषणाई करण्यात आली होती. शिवाय कृष्णकुंज इमारतही फुलांनी सजवण्यात आली होती.
साखरपुडा साधेपणानं, लग्न मात्र भव्यदिव्य...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांनी या लग्नाला आवर्जून हजेरी लावली आहे. शिवाय राज यांच्याकडून स्वतःची कमी होत चाललेली ताकद पुन्हा जीवित करण्याचा प्रयत्न अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून होत असल्याची टीकाही सोशल मीडियावर सुरू आहे. मुलाचं लग्न मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करणार असल्याचं राज यांनी काही दिवसांपूर्वीच माध्यमांशी बोलतांना सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी स्वतःचा दांडगा जनसंपर्क, कार्यकर्ते आणि होणाऱी गर्दी, खर्च यावर सूचक वक्तव्यं केलं होतं. त्यामुळं साखरपुड्याप्रमाणेच लग्नंही साधेपणानं होईल, अशी चर्चा होती. मात्र, ती आजच्या या भव्यदिव्य सोहळ्यानं खोटी ठरवली.
सध्या सरकारविरोधात व्यंगचित्र काढून काहीवेळेसाठी चर्चेत राहणाऱ्या राज यांना मुलाच्या लग्नानिमित्त का होईना थोडा वेळ प्रसिद्धीच्या झोतात राहायला मिळालं. एकुलता एक मुलगा आणि मनसेचा वारसदार असलेल्या अमितचा विवाहसोहळा भव्यदिव्य करण्यासाठी सगळी मनसेच कामाला लागल्याचं दिसलं. २०१९ च्या लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळं लग्नाला उशीर नको म्हणून अमितचं लग्न त्याआधी करून घेण्याचं नियोजन राज यांनी केलं असावं. कारण लग्नानंतर राज यांना वर्षभर निवडणूकांचं नियोजन, प्रचारसभा यातून पुरेसा वेळ मिळाला नसता. शिवाय अमितही निवडणुकांमध्ये सक्रीय राहणार असल्यानं हीच योग्य वेळ पाहून ठाकरे कुटुंबियांच्या ‘राज’पूत्राचा विवाहसोहळा जानेवारीतच पार पडला.