पोस्टातील गुंतवणूक योजना

Update: 2017-05-12 06:01 GMT

मागच्या सदरामध्ये आपण गुंतवणुकीसाठी बँक फिक्स्ट डिपॉजिट बद्दल माहिती घेतली. या सदरामध्ये आपण चर्चा करणार आहोत पोस्ट ऑफिसच्या योजना आणि ठेवींबद्दल.

150 वर्षांहून अधिक काळ भारतीय पोस्ट ऑफिस हे दळणवळणाचं मुख्य साधन आहे. पत्रांचे वितरण, लहान बचत योजना आणि जीवन विमाछत्रासह इतर अनेक योजनांमुळे लोकांचे जीवन अधिक सोपे केले आहे. भारतीय पोस्ट ऑफिसच्या 1,55,015 शाखा असून ती जगातील सर्वात मोठी अशी पोस्टल सेवा आहे. आता पोस्ट ऑफिसच्या योजनांबद्दल माहिती घेऊया.

१) पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (पीओएमआयएस):

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही ठेवीदारला नियमित मासिक उत्पन्न देणारी योजना आहे. ही योजना 5 वर्ष मुदतची आहे ( १ डिसेंबर २०११ पासून तिचा कालावधी 6 वर्षांवरून ५ वर्ष करण्यात आला आहे.)

या योजनेत किमान गुंतवणुकीची रक्कम रु. 1500 तर जास्तीत जास्त रु 4.5 लाख आहे. जर दोघांच मिळून सामाईक खातं असेल तर रू. 9 लाखापर्यंत आपण रक्कम ठेवू शकतो. ठेव रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्ट स्वरुपात ठेवता येते.

एप्रिल २०१७ ते जून २०१७ या कालावधीसाठी पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत ७.६० % व्याजदर लागू आहे. त्यामुळे गुंतवणुकदाराला ७.६० टक्के व्याजाची रक्कम मासिक उत्पन्न म्हणून मिळते. जर आपण रिटायर्ड व्यक्ती असाल तर ही योजना आपल्याला सुरक्षित आणि दर महिना उत्पनासाठी उत्तम अशी आहे. या योजेनेमध्ये आधी सुरुवातीला 5% बोनसची सुविधा होती. पण, 1 डिसेंबर 2011 पासून ती काढून घेण्यात आली आहे. 1 वर्षानंतर गुंतवणूक केलेली रक्कम मुदतीपूर्वी आपण काढू शकतो. पण 1 ते 3 वर्षांच्या दरम्यान खाते बंद केल्यास जमा केलेल्या रक्कमेपैकी 2% रक्कम दंड म्हणून वजा केली जाते. जर ३ वर्षांनंतर खाते बंद केल्यास जमा केलेल्या रक्कमेपैकी १% रक्कम दंड म्हणून वजा केली जाते.

२) पोस्ट ऑफिस टाईम डिपॉजिट (पीओटीडी):

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉजिट व्यावसायीक बँकांच्या मुदत ठेवींप्रमाणेच असतात. पोस्ट ऑफिसमध्ये आपण एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षांच्या मुदतीसह ठेवी खाते उघडू शकतो. यामध्ये किमान 200 ते कमाल अमर्यादीत रक्कम ठेवू शकतो. या खात्यावरील व्याजदर हे दरवर्षी रीसेट केले जाते .

एप्रिल २०१७ ते जून २०१७ या कालावधीसाठी पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट वर 7.08% ते 7.93% व्याजदर 1 वर्ष ते 5 वर्षे कालावधीच्या ठेवीसाठी आहे. या व्याजदरामध्ये तिमाही नंतर चक्रवाढ होते आणि ते करपात्र आहे. पण, पाच वर्षांची मुदतठेव आयकर कायदा, 1961 च्या कलम 80 सी अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र आहे.

पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवींवरील व्याजदरांची यादी खालीलप्रमाणे आहे.

 

कालावधी दर
1 वर्ष6.9
2 वर्ष7
3 वर्ष7.2
4 वर्ष7.7

 

३) पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव:

पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (आरडी) खाते भारतात राहणाऱ्या व्यक्तीलाच उघडता येते. किमान रू. 10 दर महिना आणि त्या नंतर रु. ५ च्या पटीत आपण ठेव यामध्ये ठेऊ शकतो. कमाल मर्यादा या योजनेमध्ये नाही. त्याचबरोबर व्याज हे तिमाही चक्रवाढ आधारावर आहे. संपूर्ण रक्कम व्याजासह मुदतपुर्तीला दिली जाते. या ठेवीवरील व्याज मात्र करपात्र आहे.

दर महिना ठेवीची रक्कम नाही भरल्यास त्यावर दंड आकारला जाऊ शकतो. जर चार महिने रक्कम भरली नाही किंवा सतत हप्ते चुकत असतील तर पोस्ट ऑफिसद्वारे खातं बंद करू शकतं. त्याच बरोबर आगाऊ ठेव रक्कम आपण खात्यामध्ये ठेवू शकतो. पण, त्यावर नाममात्र सवलत दिली जाते. तीन वर्षांनंतर खाते बंद करता येत. पण, मुदतीपूर्वी रक्कम काढल्यास इतर बँकांच्या बचत खात्यावरील व्याजदर प्रमाणे व्याजदर दिला जातो. खाते कार्यान्वित झाल्यानंतर कमीत कमी एक वर्षाचे डिपॉजिट किंवा 12 मासिक हप्ते जमा झाल्यास एकदा पैसे काढण्याची परवानगी आहे. त्याची परतफेड एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये केली जाऊ शकते. या ठेवीवरील व्याज हे करपात्र आहे. मॅच्युरिटीनंतर ठेव पुन्हा ५ वर्षाकरीता वाढवता येते.

 

  • कमलेश भगत

(लेखक गुंतवणूक सल्लागार म्हणून हाईपॉइंट सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कार्यरत आहे )

Similar News