मंदी ही चिंताजनक बाब असून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्याचं मत रिजर्व बँकेचे माजी गवर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे. देशाला आर्थिक सुधारणांची गरज असून थातूर-मातूर उपायांनी यावर दिलासा मिळू शकणार नाही, उर्जा आणि बँकेतर वित्तीय संस्थांच्या क्षेत्रात मोठ्या सुधारणा करण्याची गरज आहे आणि सरकारने यावर तात्काळ काम केलं पाहिजे असं मत राजन यांनी व्यक्त केलं आहे. जीडीपी मोजण्याच्या बदललेल्या पद्धतीवरही राजन यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
विकास दराचं खरं चित्र काय आहे हे समोर असल्याशिवाय प्रभावी उपाययोजना केल्या जाऊ शकत नाहीत. खासगी संस्थांच्या विकासदराच्या आकडेवारी आणि सरकारच्या आकडेवारीत फरक आहे. अशा वेळी अर्थव्यवस्थेतील मंदी हा खरंच चिंतेचा विषय आहे, असं मत रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 2018-19 मध्ये 6.8 टक्के इतका होता. 2014-15 पेक्षा हा सर्वांत कमी विकास दर आहे. रिजर्व बँक आणि खासगी संस्थांच्या आकडेवारीनुसार दरडोई ढोबळ उत्पन्न हे सरकारी 7 टक्के अनुमानाच्या कमी असणार आहे. याचाच अर्थ यंदाची मंदी खूप मोठी आहे.
ऑटो सेक्टर हे दोन दशकांमधल्या सगळ्यांत वाईट काळातून जात आहे. ऑटो आणि निगडीत क्षेत्रात बेरोजगारीचं संकंट वाढलंय. बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री बंद दिसतेय, एफएमसीजी कंपन्यांच्या व्यवसायातही घट झालीय. या परिस्थितीवर भाष्य करताना राजन म्हणतात की, तुमच्या आसपासच्या सर्व उद्योगांमधून आता हा चिंतेचा स्वर उमटू लागला आहे, अशा वेळी त्या सर्वांना दिलासा देण्याची गरज आहे.
नव्याने काही आर्थिक सुधारणा कराव्या लागतील, तरच अर्थव्यवस्था ताळ्यावर येईल असं राजन यांना वाटतंय. देशाची अर्थव्यवस्था नवीन उंचीवर नेण्यासाठी अनेक उपाय करावे लागतील, देशाची अर्थव्यवस्था अशा उंचीवर बघायला मला ही आवडेल. पण एखाद-दुसऱ्या कार्यक्रमाने ही अर्थव्यवस्था सुधारता येणार नाही. त्यासाठी नियोजनबद्ध उपाय करण्याची आवश्यकता आहे. जागतिक बाजारातून पैसे उभे करणं ही केवळ रणनितीचा भाग असू शकेल उपाय नाही, असं राजन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
उर्जा आणि गैरबँकींग क्षेत्राला तात्काळ सुधारणांची गरज आहे. या सुधारणा जर लांबणीवर टाकल्या तर मात्र, स्थिती आणखी खराब होणार आहे. खाजगी क्षेत्रात गुंतवणूक येण्यासाठीही प्रयत्न केले पाहिजेत असंही राजन यांना वाटतंय. खाजगी क्षेत्रात गुंतवणूक येण्यासाठी आर्थिक सुधारणांची गरज आहे. व्यवस्थित विचार करून, अजिबात धुसमुसळेपणा न करता आर्थिक धोरणांवर काम करण्याची गरज असून सध्याच्या अतिशय तंग वित्तीय परिस्थितीत पार बोल्ड निर्णय घेण्याएवजी संयमित आणि दूरगामी उपाययोजनांवर भर देण्याची गरज आहे असं राजन यांना वाटतंय.
जीडीपी संदर्भात माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी जी मांडणी केलीय त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. चुकीच्या आकडेवारी आणि गृहीतकांवर आधारित योजना चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात, दिशाभूल करू शकतात असं मत राजन यांनी व्यक्त केलं.
इतिहासाची पुनरावृत्ती होत नाही. 2008 पेक्षा यंदाची स्थिती वेगळी आहे. 2008 मध्ये जे क्षेत्र नफ्यात होते त्यापेक्षा वेगळ्या क्षेत्रात यंदा फायदा दिसतोय. जागतिक अर्थव्यवस्था कोसळेलच अशातला भाग नाही, पण ती कोसळलीच तर ती तेव्हा पेक्षा वेगळ्या क्षेत्रांमधून असेल असं ही राजन यांनी म्हटलंय.
व्यापार आणि जागतिक गुंतवणूक या क्षेत्रात चिंतेचं वातावरण आहे. अशा वेळी केवळ जुन्या समस्या दूर करून परिस्थिती सुधारणार नाही, तर नव्या समस्या निर्माण होऊ नये म्हणून प्रयत्न करावे लागतील असं ही राजन यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलंय.