कुमार केतकर@७५: विजय चोरमारे
आज ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी कुमार केतकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे...
संपादक म्हणजे वेगळ्या जगातली आसामी, असं वाटण्याचा एक काळ होता. त्यात पुन्हा महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ताचे संपादक म्हणजे परग्रहावरचे प्राणी असल्याचाच समज होता. काळ बदलला. सगळ्यांचंच सुमारीकरण झालं. त्याला एखादा अपवाद वगळता संपादक मंडळीहीही अपवाद राहिले नाहीत. किंबहुना सुमारपणा आणि विलक्षण लवचिकता ही तर संपादकांची वैशिष्ट्येच बनली.
माझ्यासारख्या कोल्हापुरातल्या पत्रकाराची संपादकांसंर्भातली भावना वेगळी नव्हती. आधी तळवलकर, गडकरी आणि नंतर टिकेकर, केतकर ही आमच्यादृष्टीनं सर्वोच्च शिखरं होती. नंतरच्या काळात निखिल वागळे यांच्या वेगळ्या शैलीचं आकर्षण वेगळंच होतं. आपण पामरांनी ही शिखरं दुरून अनुभवायची अशीच धारणा आणि परिस्थितीही होती. पण घटना अशा घडत गेल्या की या थोर संपादकांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले.
मी सकाळमध्ये असताना एकदा टिकेकरांचा फोन आला. तेव्हाचा आनंद शब्दात सांगता येणारा नव्हता. २००३ मध्ये लोकमतची कोल्हापूर आवृत्ती सुरु करायची होती, तेव्हा मी लोकमतमध्ये यावे अशी ऋषी दर्डा यांची इच्छा होती. मी सकाळमध्ये कोल्हापूरहून मुंबईला येऊन दोन अडीच महिने झाले होते. मी मुंबईत असल्यामुळं ऋषी दर्डा यांनी टिकेकरांना आधी माझ्याशी बोलून घ्यायला सांगितलं होतं आणि तिथून त्यांच्याशी दोस्ताना सुरू झाला होता. वयात खूप अंतर होतं तरी त्याला दोस्तानाच म्हणता येईल. त्याबद्दल तपशीलवार लिहिण्याजोगतं खूप आहे, पण आजच्या लेखाचा विषय आहे, कुमार केतकर.
केतकर हे तर हिरोच होते माझे. त्यांच्याशी कधी भेटण्याचा, बोलण्याचा योग येईल असं वाटत नव्हतं. पण काही गोष्टी घडायच्या असतात. प्रहारमध्ये असताना एकदा केतकर ऑफिसमध्ये आले होते. २०१० साल असावं. इंडियाबुल्स टॉवर मध्ये NDTV चे ऑफिस सातव्या मजल्यावर आणि प्रहारचे नवव्या मजल्यावर. NDTV चा डिबेट शो उरकून ते प्रहारच्या ऑफिसमध्ये आले.
आल्हाद गोडबोले, मुकेश माचकर हे संपादक, निवासी संपादक आधीचे केतकरांचे सहकारी. मटा, लोकसत्तातली इतरही बरीच मंडळी होती. केतकर आल्यावर सगळ्यांनी त्यांना भेटायला गर्दी केली. जुन्या संपादकाबद्दल किती प्रेम असू शकतं लोकांना हेही यानिमित्तानं दिसून येत होतं. एवढे मोठे संपादक, त्यांची आपली ओळख नाही, शिवाय एवढ्या मोठ्या माणसाशी काय बोलायचं हा न्यूनगंड होताच. त्यामुळं केतकर वगैरे आपल्या गावी नाहीत असं समजून मी आपलं काम करत जागेवर बसलो होतो. तेव्हा माचकर माझ्याजवळ येऊन म्हणाले,
केतकरांना भेटत नाही का? म्हटलं, अहो माझी काही ओळख नाही तेव्हा उगीच आपलं, मी अमुक अमुक असं औपचारिक बोलण्यात काय अर्थ आहे? त्यावर माचकर म्हणाले, अहो ओळख नाही तर करून घ्यायची, चला. त्यांच्या आग्रहामुळं मी संपादक आल्हाद गोडबोलेंच्या केबिनमध्ये गेलो. एव्हाना तिथली गर्दी कमी झाली होती.
'मी विजय चोरमारे', अशी ओळख करून देऊन त्यांना नमस्कार केला. त्यावरची त्यांची जी प्रतिक्रिया होती, तो आजवरचा मोठा पुरस्कार वाटतो. अत्यंत उत्साहानं केतकर म्हणाले, 'मला भेटायचं होतं तुम्हाला. मी तुमचा नियमित वाचक आहे. तुमच्या माझ्या दृष्टिकोनात काही फरक असेल, पण तुम्ही पोलिटिकली करेक्ट असता. मी आल्हादजवळ अनेकदा तुमच्या लेखनाबद्दल कळवलंय.'
साक्षात केतकर बोलत होते आणि माझी स्थिती नेमकी कशी झाली होती, ते मलाच कळत नव्हतं. इथं गोडबोलेंचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आपल्या सहकाऱ्यांना मोठेपण देण्याएव्हढं मोठं मन त्यांच्याकडं होतं. हे आपण केतकरांकडून शिकलोय हेही ते आवर्जून सांगायचे. प्रहारमध्ये असताना एकदा मी शरद पवारांवर एक लेख लिहिला. गोडबोलेंना पवारांचं राजकारण आवडत नव्हतं. त्यामुळं त्यांनी त्या लेखावर माझा चांगला तासभर क्लास घेतला. पवारांच्या राजकारणाच्या सगळ्या उलट्या बाजू सांगितल्या. दरम्यान आपला लेख केराच्या टोपलीत जाणार याची मला खात्री झाली होती. पण सगळं झाल्यावर गोडबोले म्हणाले,
'तुझ्या लेखातील मतांशी मी सहमत नसलो तरी मी तो छापणार आहे. कारण ते तुझं मत आहे. आणि मी केतकरांकडून संपादकीय लोकशाहीचा संस्कार घेतला आहे.' नारायण राणेंच्या पेपरमध्ये पवारांची भलावण करणारा लेख छापून आला, त्याला कारण केतकर होते. पवार यांच्या संदर्भातील त्या लेखावरून काही लोकांनी राणेंपर्यंत कागाळ्या केल्याचंही नंतर कानावर आलं. .... तर गोडबोलेंना एखाद्या अग्रलेखासंदर्भात फोन आला तर तो अग्रलेख कुणी लिहिलाय? हे ते समोरच्या व्यक्तीला सांगायचे. आणि ती कॉम्प्लिमेंट आपल्या सहकाऱ्यापर्यंत पोहोचवायचे. केतकरांच्याकडून आलेल्या अशा काही कॉम्प्लिमेंट्स त्यांनी त्याआधी माझ्यापर्यंत पोहोचवल्या होत्या. (दहा वर्षांपूर्वीचंच हे आहे, पण शतकापूर्वीचं वाटावं इतकी परिस्थिती बदललीय.)
एकूण केतकरांची ही पहिली भेट अविस्मरणीय ठरली. त्यावेळी त्यांनी स्वतःहोऊन माझा फोन नंबर घेतला. नंतरच्या काळात काही वेगळं लिहिलं तर आवर्जून मेसेज करून कळवत राहिले. नंतर मी कोल्हापूरला महाराष्ट्र् टाइम्सच्या आवृत्तीला संपादक म्हणून गेलो. कोल्हापूरच्या अर्बन बँकेला केतकरांना व्याख्यानासाठी बोलवायचं होतं पण पाच वर्षे प्रयत्न करूनही जमत नव्हतं.
माझे ज्येष्ठ मित्र भरत खानोलकर अर्बन बँकेच्या अशा उपक्रमाचं काम बघायचे. त्यांनी मला ही अडचण सांगितली. मी लगेच केतकरांना फोन लावला. अर्बन बँक आणि व्याख्यानाचं बोलून म्हटलं तुम्हाला यायचं आहे. त्यांनी समोरून तारीख सांगितली आणि म्हणाले, अमुक तारखेला चालेल का ? मी तिथंच समोर खानोलकरांना विचारलं आणि एका फोनमध्ये व्याख्यान फायनल झालं. अर्बन बॅंकेची मंडळी म्हणाली, अहो आम्ही पाच वर्षे प्रयत्न करतोय, पण एका फोनवर काम झालं.
केतकरांचं वैशिष्ट्य जाणवलं ते म्हणजे आपल्या सहकाऱ्यांना मोठेपण द्यायचं. त्यांची ही कृती तशी छोटी असली तरी माझ्यादृष्टीनं खूप मोठी होती. नंतर एकदा गोविंद पानसरे अण्णांनी एका व्याख्यानाला बोलावलं होतं. शाहू स्मारक भवनातलं व्याख्यान संपल्यावर त्यांना भेटलो तर त्यांनी 'कुठं होतास?' असं म्हणून माझा हात हातात घेतला आणि एका हातात माझा हात धरुनच अनेक लोकांना भेटले. तिथून सोबत हॉटेलवर गेलो. तिथं पानसरे अण्णा वगैरे मंडळी आधीच पोहोचली होती. तिथं पुन्हा तासभर गप्पांचा फड.
मी मुंबईत परत आल्यावर नॅशनल गॅलरी मध्ये भरलेल्या धुरंधरांच्या चित्र प्रदर्शनात भेट झाली. तिथं तासभर सोबत होतो. गेल्यावर्षी मार्चमध्ये एका वेगळ्या कारणासाठी त्यांना फोन केला. म्हटलं आमच्या गावात स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राची इमारत उभी करायचीय, त्यासाठी तुमच्या खासदार फंडातून पैसे पाहिजेत. किती पाहिजेत म्हणून विचारल्यावर म्हणालो ३०-३५ लाख लागतील. म्हणाले मला एक पत्र मेल कर तसं. फक्त पैसे एप्रिलनंतर नव्या वर्षात मिळतील. यंदाचं संपलंय सगळं. ठीक आहे म्हणालो. आणि मेल केला तसा. वाटलं पाच दहा लाख तरी नक्की मिळतील. पण दोन आठवड्यातच सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडं आमच्या कामासाठी ३५ लाखाच्या निधीचं पत्र गेलंसुद्धा.
(पण मोदींना आमचं हे काम बघवलं नाही. त्यांनी करोनाचं निमित्त काढून दोन वर्षाचे खासदार निधीच गोठवून टाकले.) मी केतकरांसोबत कधी काम केलं नाही. पण त्यांची मराठीतली पत्रकारितेची कारकीर्द खूप काळजीपूर्वक पहिली. अभ्यासली. अनपेक्षितपणे त्यांचा परिचय झाला आणि त्याचं रूपांतर स्नेहात झालं. त्यांच्यासमोर आपण लिंबू टिंबू असल्याची जाणीव सदैव असते. पण त्यांनी खूप सन्मानानं, बरोबरीनं वागवलं.
माझ्यासारख्या कोणत्याही नात्यानं जवळच्या नसलेल्या व्यक्तीला शक्य तिथं ताकद देण्याचा प्रयत्न केला. जे आवडलं त्याला मोकळ्या मनानं दाद दिली. भारतीय पत्रकारितेत मराठीतली दोनच नावं माहीत आहेत, एक कुमार केतकर आणि दुसरे निखिल वागळे. त्यातले एक असलेले केतकर जेवढे वाट्याला आले, त्यामुळं जगणं खऱ्या अर्थानं समृद्ध झाल्यासारखं वाटतं.
केतकरांना अमृत महोत्सवानिमित्त खूप खूप शुभेच्छा !