डॉ. रश्मी करंदीकर, उपायुक्त, ठाणे शहर पोलीस मुख्यालय
यूपीएससी आणि एमपीएसीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची या नवीन वर्षात खूप सारी स्वप्ने असतील. तुमची सर्व स्वप्न या 2017 मध्ये पूर्ण होऊ दे...
दिल्ली किंवा उत्तरप्रदेशमधले विद्यार्थी 11 वीत प्रवेश घेतल्यानंतरच सिव्हिल सर्विसच्या परिक्षांसासाठी तयारी सुरु करतात. खरंतर आजची पिढी त्यांच्या आवडीनिवडी बद्दल, करिअर बद्दल खूप जागरूक आहे...त्यांना स्वत:ची ठाम मतं, स्वत:चा चॉईस असतो. अर्थात असं लिहिताना स्वत:ला अचानक ओल्ड जनरेशनमध्ये बसवल्याची जाणीव होते. पण जोक्स अपार्ट खरंतर मला जाणवतंय मला स्वत:ला सिव्हिल सर्विसच्या तयारीला लागायला थोडा उशीरच झाला होता. ग्रॅज्युएशन नंतर मी तयारीला सुरुवात केली. त्यामुळे मी नक्की सांगू शकते तुम्ही 12 वी नंतर सिव्हिल सर्विसमध्ये जायचे निश्चित केलं असेल तर लगेचच तयारीला लागा. विशेषत: तुमचा विषय सिव्हिल सर्विसच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत असु द्या.
आता इंटरनेटमुळे सर्व गोष्टी सुलभ झाल्यात. त्यामुळे तुम्हाला सिलॅबस शोधण्यासाठी दुकानं पालथी घालावी लागणार नाहीत. इंटरनेटवर आता बऱ्याच अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं साईट्स उपलब्ध आहेत. परिक्षेसंदर्भात काही चांगली उजळणी एप्स आणि पेपर्स देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे इंटरनेटचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी न करता आपल्याला अभ्यासासाठी देखील करता येईल. या सर्व गोष्टींचा आणि पुस्तकांचा उपयोग करून स्वत:च्या नोट्स काढणे खूप चांगले. कारण स्वत:च्या नोट्समध्ये तुमची रिविजन तर होतेच आणि स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिण्यानं तुम्हाला लक्षात ठेवायला देखील फायदा होतो. मी नोट्स काढताना बाजूला समासाची थोडी मोठी जागा मोकळी ठेवायची. त्यामध्ये मला त्या त्या नोट्सचा भाग लक्षात ठेवण्याचे छोटे छोटे शॉर्टकट्स, मुद्दे लिहून ठेवायचे. हे मुद्दे लाल शाईनं आणि नोट्स काळ्या शाईच्या पेनानं लिहायचे. पेपरच्या आदल्या दिवशी रिव्हिजन करताना मला हे रंगीबेरंगी पेपर्स वाचताना मला थोड सोप्प व्हायचं.
सिव्हिल सर्विसच्या तयारीसाठी सर्वात महत्त्वाचा लागणारा गुण म्हणजे तुमच्या प्रयत्नातलं सातत्य. इतर परिक्षांमध्ये तुम्हाला पास झाल्यावर प्रमाणपत्र मिळते. तीन वर्षाचा कोर्स झाल्यावर तुम्हाला डिग्री मिळणार हे माहिती असते. पण सिव्हिल सर्विसमध्ये परिक्षेच्या वेळापत्रकानुसार सर्व असते. काही जणांना इंटरव्ह्यूपर्यंत जाऊन फेल झाल्यावर पुढच्या आठवड्यात प्रिलीमची तयारी करून प्रिलीमला सामोरे जाताना पाहिलंय. मानसिकदृष्ट्या कुठेही न खचता पुढच्या परिक्षेला सामोरे जाणे ही खरोखरच एक प्रकारे कठीण परिक्षा असते. त्याकरिताच कुठेही खचून न जाता तुमचं अभ्यासातलं सातत्य महत्त्वाचं असतं. अगदी सुरुवातीला सिव्हिल सर्विसची तयारी करताना पहिले काही महिने खूप जोमाने अभ्यास होतो. पण काही महिन्याच्या अभ्यासानंतर कंटाळा येतो. अभ्यासाला मूड लागत नाही थोडक्यात अभ्यासाचा टेम्पो बिघडतो हीच धोक्याची घंटा असते. या दरम्यान आपल्याला अभ्यासापासून दूर नेणा-या अनेक गोष्टी खुणावतात. त्याला बळी पडलो की नंतर परिक्षा जसजशी जवळ येऊ लागते तसंतसं आपल्याला वेळ उगाच फुकट घलवल्याची अपराधी भावना मनात येते. मग त्या भावनेनं अजून आपला अभ्यास मागे राहतो. त्यासाठी आपलं टाईम मॅनेजमेंट आणि सातत्य या दरम्यान असलेल्या सर्व अडथळ्यांवर मात करण्यासाठी आपली अतीव इच्छाशक्ती फार महत्वाची ठरते. आजही मला माझे डेविड ससून लायब्ररी आणि मुंबई विद्यापीठातल्या लायब्ररीमधले कित्येक तास आठवतात. मागे वळून बघताना स्वत:चं आश्चर्य देखील वाटते. कोणत्या जूनूनमध्ये १७-१७ तास अभ्यास केला ठावूक नाही. पण मला ते माझ्या आयुष्यातील लायब्ररीतले दिवस खूप अनमोल वाटतात. लायब्ररीत झोकून देऊन अभ्यास करण्याची मज्जा आणि अभ्यासाची नशा काही औरच असते. सर्व स्पर्धा परिक्षा देणा-या विद्यार्थ्यांना खूप शुभेच्छा!
अभ्यासात आणि प्रयत्नात सातत्य ठेवा, ध्येयाकडे पाहा, मनापासून अभ्यास करा! अंतिमत: यश तुमचेच आहे! पण लक्षात ठेवा परिक्षा पास झाल्यावर तुमचा प्रवास संपत नाही, तर तुमचा खरा प्रवास तिथे सुरु होतो. या प्रवासाला वाटचाल करण्याना ऑल दी बेस्ट
डॉ. रश्मी करंदीकर, उपायुक्त, ठाणे शहर पोलीस मुख्यालय