दुष्काळात शेतकरी असताना तुम्हाला पीक विमा कंपन्या जुमानत नाहीत ? ; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवाजी पार्क मैदानावरील दसरा मेळाव्यात शेतकरी प्रश्नावर सरकारवर हल्ला चढवला.;
दुष्काळ आणि अग्रीम पीक विम्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीय. खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थिती पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना अग्रीम नुकसान भरपाईसाठी हात वर करत असताना सरकार काय करतयं ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर हल्ला चढवला. शिर्डी परिसरातील गावांमध्ये दुष्काळी पाहणी दौऱ्यासाठी आपण तिथे गेलो होतो. तिथली शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून आपल्या आयुष्यातील सर्वात भावनिक प्रसंग काय होता, या विषयी उद्धव ठाकरे यांनी जाहिरपणे भाष्य केले.
सुरुवातीला ठाकरे यांनी एक रुपयात पीक विमा योजनेचे कौतुक केले. शेतकऱ्यांचा हिस्सा सरकारने भरल्याने पीक विमा योजनेत सुमारे १ कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. पण आता पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. सरकारकडून पंचनामे पूर्ण होईपर्यंत सरकाराने अग्रीम भरपाई देण्याचे आदेश काढले. पण विमा कंपन्यांनी ते देण्यास नकार दिला आहे. अनेक ठिकाणी २१ दिवस पावसाचा खंड पडला नसल्याचा किवा नुकसानीची नोंद न केल्याने भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मग सरकार काय करतयं? असा जाब ठाकरेंनी विचारला.
ठाकरे यांनी शिवसैनिकांना आदेश देत शेतकरी अडचणीत असल्याने त्यांच्या मदतीला उभे राहण्याचे आवाहन केले. शिवसैनिकांनी पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून बसा. जोपर्यत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. तोपर्यंत त्याला जागचे हालून देऊन नका, मग कळेल पावसाचा खंड पडल्यावर काय होते.
भाषणाच्या सुरुवातीला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक केले. मनोज जरांगे पाटील यांचे शांततेत आंदोलन सुरु होते. मात्र या डायर सरकारने जालियनवालाप्रमाणेच या शांततेत सुरु असलेल्या आंदोलनावर लाठी हल्ला केला. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली.