कॉमा. वाक्यरचनेत एक अर्थ संपवून त्याच वाक्यरचनेत संदर्भाने पुढे जायचे असल्यास मध्ये स्वल्पविराम म्हणजेच कॉमा दिला जातो. त्यामुळे वाक्यरचना वाचताना मध्येच थांबावे लागते. तसंच काहीस आयुष्याचंही असतं. कुणालाही कर्करोग म्हणजे कॅन्सर झाला असं आपण जेव्हा ऐकतो, तेव्हा मनात एक शंकेची पाल चुकचुकतेच. हा कॅन्सर म्हणजेच आयुष्याला लागलेला एक कॉमाच असतो. पण, तो पूर्णविराम न ठरता त्याला मध्ये थांबवून जीवनाला आनंदाने पूर्णत्वाकडे न्यायचं, असं सांगणारं ‘कॉमा’ हे अलका भुजबळ लिखित पुस्तक नुकतच प्रकाशित झाले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सेवानिवृत्त संचालक देवेंद्र भुजबळ यांच्या अलका भुजबळ सुविद्य पत्नी. त्या सध्या मुंबईत एम.टी.एन.एल. मध्ये कार्यरत आहेत. एक वर्षांपूर्वी त्यांना अचानकपणे गर्भाशयाच्या कॅन्सरचे निदान झाले. भुजबळ कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. परंतू, आजारपणात मिळालेली कुटुंबाची, मित्रमैत्रीणींची साथ आणि डॉ. रेखा डावर यांच्या चमूने केलेले योग्य उपचार, यामुळे त्यांनी कॅन्सरवर यशस्वीपणे मात केली. इतक्यावरच त्या थांबल्या नाहीत तर केमोथेरपी सुरू असताना त्यांनी पती, मुलगी आणि मित्रमैत्रीणींच्या आग्रहाखातर स्वानुभव लिहिण्यास सुरूवात केली. त्याच प्रेरणादायी स्वानुभवांचे ‘कॉमा’ हे पुस्तक ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेखा डावर, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड. डॉ. शत्रुघ्न फड, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र वाबळे, डिम्पल प्रकाशनचे अशोक मुळ्ये आदी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झाले.
“आज अलका भुजबळ तुमच्यासमोर ठणठणीत बरी होऊन उभी आहे. पण, तिचा कॅन्सर पुढे फोफावण्याची लक्षणं होती, हे मला आज सांगायला हरकत नाही. त्यामुळे त्यांना उपचारासोबत मानसिक आधार देत, पूर्ण अभ्यासाअंती ऑपरेशन केले आणि ते यशस्वी केले. अलकाची इच्छाशक्ती आणि जवळच्या व्यक्तींची सकारात्मक उर्जा ह्यामुळे अलका यातून बाहेर पडली. प्रत्येक स्त्रीने वयाची चाळीशी उलटल्यावर नियमित आरोग्य तपासणी करणं गरजेचे आहे. इतकंच नव्हे तर प्रत्येक कंपनीने कर्मचाऱ्यांना वाढदिवस भेट म्हणून आरोग्य तपासणी करून देणं, ही नैतिक जबाबदारी मानली पाहिजे. तरच पहिल्या व दुसऱ्या पायरीवरच कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारावर मात करणं सहज शक्य होईल. महिलांनी चाळिशीनंतर नियमित आरोग्य तपासणी, विशेषत: पॅप स्मिअर सोनोग्राफी करावी. जेणेकरून प्राथमिक अवस्थेतच निदान होऊन रुग्ण बरा होण्यास मदत होते. वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकता नागरीकांसाठी घातक ठरत असली तरी नागरीकांनी आरोग्याबाबत अधिक जागरूक राहणे काळाची गरज आहे, ह्या पुस्तकातून कॅन्सर रुग्ण, नातेवाईकांना मार्गदर्शन, समुपदेशन होईल, असा विश्वास ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ रेखा डावर यांनी केले.
“पैसा आणि तंत्रज्ञानामुळे जरी आजारावर मात करता येऊ शकते. तरीही कॅन्सर सारखा आजार बरा होण्यासाठी आवश्यक असते, ती त्या रुग्णाची इच्छाशक्ती, स्वत:वरचा तसेच उपचारांवरचा विश्वास आणि जवळच्या व्यक्तींचा मानसिक आधार. नेमक्या ह्याच सर्व गोष्टी अलका भुजबळ यांच्या बाबतीत जुळून आल्याने त्यांनी कॅन्सरवर मात केली आणि आज त्या तुमच्यासमोर उभ्या आहेत. यासाठी मी अलकाची लेक देवश्री आणि पती देवेन्द्र भुजबळ आणि अलकाच्या हिमतीला सलाम करते,” अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिका विजया वाड यांनी भावना व्यक्त केल्या.
“आज मी एका मुलीची आई आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण, माझी मुलगी देवश्रीच्या आग्रहाखातर मी कॅन्सरवरील उपचारांना हिमतीने सामोरे गेले. ह्या पडत्या काळात तिने माझ्या आईची भूमिका पार पडली. माझे पती देवेन्द्र, मैत्रीणी आणि नातेवाईक तसेच टिव्ही मालिकांनी माझ्या ह्या पडत्या काळात माझे मनोबल वाढवण्यात मदत केली. डॉ. रेखा डावर, डॉ. जैन आणि डॉ. मेनन, डॉ. डेलीवाला यांच्या मुळे मी आज इथे उभी आहे. हे पुस्तक तमाम कॅन्सरग्रस्त आणि सामान्य नागरीकांना दुर्धर आजारातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच मदत करेल,” असा आत्मविश्वास अलका भुजबळ यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
देशात दर आठव्या मिनिटाला गर्भाशयाच्या कॅन्सरने महिला दगावते. तर दरवर्षाला सात लाखांहून अधिक रुग्णांना कर्करोग होतो, असे राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध आणि संशोधन संस्था सांगते. यावरुनच कॅन्सरची तीव्रता लक्षात येते. या आजारावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळीच उपचार घेतल्यास कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो, हे श्रीमती भुजबळ यांनी आत्मकथनातून सांगितलेय. आजारपणात येणाऱ्या अडचणी, समस्या, समाजाची बघण्याची मानसिकता स्वविचार तसेच डॉक्टरांची उपचारादरम्यान अपेक्षा, डॉक्टरांवर विश्वास, नात्यांची जपणूक व मानसिक आधार यावर ‘कॉमा’मध्ये सविस्तर, सोप्या, सहज आणि ओघवत्या भाषेत लिखाण केले आहे. कॅन्सरग्रस्त रुग्ण, नातेवाईकांसाठी हे पुस्तक मोलाचेच आहे. त्यामुळे कॅन्सरबाबतचा गैरसमज, भीतीही दूर होईल.
-देवेंद्र भुजबळ